नवी दिल्ली : जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात स्टॉकिस्ट आणि किरकोळ व्यापाऱ्यांकडून नव्याने झालेल्या मागणीमुळे गुरुवारी सोन्याचा भाव १७५ रुपयांनी उंचावून २८,३५० रुपये प्रति दहाग्रॅम झाला. चांदीचा भावही औद्योगिक संस्था आणि नाणेनिर्मात्यांकडून मागणीचे बळ मिळाल्याने १५० रुपयांनी वाढून ४५,००० रुपये प्रतिकिलो झाला.चीन आणि भारताकडून मागणी वाढल्याने जागतिक बाजारात तेजी होती. सराफा व्यापारी आणि रिटेलर्स यांच्याकडून चांगली मागणी झाल्याने दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव वधारले. भारत आणि चीन हे सर्वांत मोठे सोने-चांदीचे ग्राहक म्हणून ओळखले जातात. सिंगापूरात सोन्याचा भाव ०.७० पैशाने उंचावून १,३०८.३१ डॉलर प्रतिऔंस आणि चांदीचा भाव ०.३ टक्क्यांनी वधारून २०.८२ डॉलर प्रतिऔंस झाला. दिल्ली बाजारातच ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १७५ रुपयांनी वाढून अनुक्रमे २८,३५० रुपये आणि २८,१५० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. गेल्या तीन सत्रांत यात ५५५ रुपयांची घट नोंदली गेली. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २४,८०० रुपयांवर कायम राहिला. तयार चांदीचा भाव १५० रुपयांच्या तेजीसह ४५,००० रुपये आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव २१० रुपयांनी उंचावून ४४,९३५ रुपये प्रतिकिलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव मागणी वाढल्याने एक हजार रुपयांनी वधारून खरेदीसाठी ८०,००० रुपये आणि विक्रीसाठी ८१,००० रुपये प्रतिशेकडा राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोने-चांदीचे भाव सावरले
By admin | Updated: July 18, 2014 02:01 IST