Join us

सोन्या-चांदीने झळाळी गमावली

By admin | Updated: October 16, 2015 22:22 IST

सोने आणि चांदी यांना गेल्या दोन दिवसात मिळालेली झळाळी शुक्रवारी कमी झाली. व्यापाऱ्यांकडून कमी मागणी झाल्याने सोने दहा ग्रॅममागे १५० रुपयांनी, तर चांदी किलोमागे १६० रुपयांनी घसरली.

नवी दिल्ली : सोने आणि चांदी यांना गेल्या दोन दिवसात मिळालेली झळाळी शुक्रवारी कमी झाली. व्यापाऱ्यांकडून कमी मागणी झाल्याने सोने दहा ग्रॅममागे १५० रुपयांनी, तर चांदी किलोमागे १६० रुपयांनी घसरली.सोन्याने गेल्या दोन दिवसांत तीन महिन्यातील उच्चांकी दर गाठला होता; मात्र जागतिक बाजाराप्रमाणेच स्थानिक बाजारातही व्यापाऱ्यांकडून मागणी घटल्याने आज दर घसरले. सिंगापुरात सोने ०.६ टक्क्यांनी घसरून १,१७६.१६ डॉलर प्रति औंस झाले. चांदीही ०.६ टक्क्यांनी घसरून १६.०३ डॉलर प्रति औंस झाली. राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ या दोन्ही प्रकारच्या सोन्याचे भाव १५० रुपयांनी घसरून अनुक्रमे २७,१५० आणि २७००० रुपये (प्रति १० ग्रॅम) झाले. गेल्या दोन सत्रात सोन्याचे भाव ५०० रुपयांनी वाढले होते. चांदीही १६० रुपयांनी घसरल्याने ३७,२४० रुपये प्रति किलो झाली. औद्योगिक कारखाने आणि नाणे उत्पादक यांच्याकडून मागणी घटल्याने चांदीचे भाव घटल्याचे सांगण्यात आले. चांदीच्या नाण्याचे भावही ५०० रुपयांनी घसरले. १०० नाण्यांच्या खरेदीचा दर ५२ हजार रुपये, तर विक्रीचा दर ५३ हजार रुपये होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)