Join us

रत्ने, दागिन्यांची निर्यात वाढली

By admin | Updated: August 26, 2016 06:54 IST

एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या काळात भारताची रत्ने आणि दागिने निर्यात ११.७ टक्क्यांनी वाढून ११.४ अब्ज डॉलर झाली.

नवी दिल्ली : एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या काळात भारताची रत्ने आणि दागिने निर्यात ११.७ टक्क्यांनी वाढून ११.४ अब्ज डॉलर झाली. अमेरिकेसारख्या प्रमुख बाजारांतील मागणी वाढल्यामुळे निर्यातीत वाढ झाली.रत्न आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेने (जीजेईपीसी) यासंबंधीची आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या वर्षी या काळात १0.२१ अब्ज डॉलरची निर्यात झाली होती. देशाच्या एकूण निर्यातील रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीचा वाटा १४ टक्के आहे. एप्रिल ते जुलै या काळात निर्यात वाढण्यामागे पैलू पाडलेल्या आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांची वाढलेली निर्यात हे मुख्य कारण आहे. या अवधीत पैलू पाडलेल्या हिऱ्यांची निर्यात वाढून ७.२५ अब्ज डॉलरवर गेली. गेल्या वर्षी याच अवधीत ती ६.८९ अब्ज डॉलर होती. यंदा चांदीच्या दागिन्यांची निर्यातही ५१ टक्क्यांनी वाढून १.३0 अब्ज डॉलरवर गेली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिकेसारख्या बाजारांत भारतीय रत्ने आणि दागिन्यांची मागणी सातत्याने वाढत आहे. त्याचा लाभ निर्यातदारांना मिळाला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)