मुंबई : आयपीओ बाजारातील सुधारणांमुळे व्यवसाय करणे अधिक सुलभ होईल, असा विश्वास व्यक्त करताना सेबीचे चेअरमन यू. के. सिन्हा यांनी सेबी फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. गुंतवणूकदारांचे हित जपत भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाने (सेबी) फसवणुकीच्या प्रकरणात आजवर २ हजार कोटींची संपत्ती केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.सेबीने दाखल केलेल्या प्रकरणांच्या सुनावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष कोर्टामुळे गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यांविरुद्धच्या खटल्याची सुनावणी जलद गतीने होईल, तसेच गुंतवणूकदारांनाही त्यांचा पैसा लवकर परत मिळवून देता येईल, असेही सिन्हा म्हणाले.मागच्या वर्षी सेबीच्या कायद्यात दुरुस्ती करण्यात आल्यानंतर विशेष कोर्ट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दुरुस्तीतहत सेबीला गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्याबाबत, तसेच भांडवली बाजाराचे नियमन करण्यासंदर्भात व्यापक अधिकार मिळाले आहेत. मुंबईत विशेष कोर्ट स्थापन झाले असून या कोर्टात प्रकरणे दाखल करण्यात येत आहेत, असे त्यांनी वृत्तसंस्थेला मुलाखत देताना सांगितले. नव्या अधिकारामुळे फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध खटले दाखल करण्यास मोठी मदत मिळाली आहे. घसघशीत परताव्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य जनतेसह गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यांचा या प्रकरणात समावेश आहे.आकडेवारीनुसार सेबीने नवीन अधिकारांतहत ७०० हून अधिक प्रकरणांत २१०० हून अधिक जप्तीची कारवाई सुरू केली आहे. यात बँक व डीमॅट खाते आणि चल-अचल संपत्तीची जप्ती आणि दोषींच्या अटकेचाही समावेश आहे.गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठीचे नियम आणि उपाययोजनांच्या बाबतीत भारताचे चांगले मानांकन आहे. तथापि, सुलभ व्यवसायाच्या दृष्टीने भारताची स्थिती खराब आहे. तथापि, ही स्थिती सुधारण्यासाठी सेबी उपाय करीत आहे. व्यावसायिक सुलभीकरणाच्या दृष्टीने जागतिक बँकेच्या निर्देशांकानुसार भारत मागच्या वर्षी ७ व्या क्रमांकावर होता. आता भारत १४० व्या क्रमांकावर आहे.
फसवणुकीच्या खटल्यांना मिळणार गती
By admin | Updated: July 26, 2015 22:59 IST