Join us  

चार वर्षांत कार्डे, एटीएम होणार निरुपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 10:24 PM

डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सध्या सरकारकडून कार्ड पेमेंटस्चा जोरदार प्रचार केला जात असला तरी येत्या चार वर्षांत डेबिट कार्डे, क्रेडिट कार्डे निरुपयोगी होतील. त्यांच्यासोबतच एटीएमही संपतील, असे प्रतिपादन नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी केले आहे. त्यांनी सांगितले की, आगामी काळातील सर्व आर्थिक व्यवहार लोक आपल्या मोबाइलवरूनच पार पाडतील.

ठळक मुद्देनीती आयोग : सर्व आर्थिक व्यवहार होणार मोबाईलवरून 

नोएडा (उत्तर प्रदेश) : डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सध्या सरकारकडून कार्ड पेमेंटस्चा जोरदार प्रचार केला जात असला तरी येत्या चार वर्षांत डेबिट कार्डे, क्रेडिट कार्डे निरुपयोगी होतील. त्यांच्यासोबतच एटीएमही संपतील, असे प्रतिपादन नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी केले आहे. त्यांनी सांगितले की, आगामी काळातील सर्व आर्थिक व्यवहार लोक आपल्या मोबाइलवरूनच पार पाडतील.अ‍ॅमिटी विद्यापीठाच्या वतीने कांत यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. त्यानिमित्त विद्यापीठाच्या नोएडा येथील कॅम्पसमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी कांत यांनी सांगितले की, भारतातील ७१ टक्के लोकसंख्या ३२ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. अमेरिका आणि युरोपच्या तुलनेत हे प्रमाण खूपच अधिक आहे. त्यामुळे अमेरिका आणि युरोपीय देशांच्या तुलनेत भारताला लोकसंख्यात्मक लाभांश जास्त मिळेल. कांत म्हणाले की, भारतात क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि एटीएम व्यवस्था येत्या तीन ते चार वर्षांत निरुपयोगी होऊन जाईल. येत्या काळात भारतातील सर्व आर्थिक देवघेव मोबाइलद्वारेच होईल. कोट्यवधींच्या संख्येत बायोमेट्रिक डाटा उपलब्ध असलेला भारत हा जगातील एकमेव देश आहे. त्यासोबतच मोबाइल फोन आणि बँक खातीही उपलब्ध आहेत. त्यामुळे डिजिटल क्षेत्रात खूप प्रकारच्या नव्या गोष्टी भारतात होतील. याबाबतीत भारत जगात एकमात्र देशही ठरेल. मोबाइलवर सर्वाधिक व्यवहार भारतात होतील. हा कल आतापासूनच दिसायला लागला आहे.