Join us  

'या' कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी मे २०२१ पर्यंत 'वर्क फ्रॉम होम', कोरोना झाल्यास २८ दिवस 'पेड लीव्ह' 

By ravalnath.patil | Published: December 05, 2020 1:54 PM

work from home : काही कंपन्यांनी अद्यापही 'वर्क फ्रॉम होम' सुरुच ठेवले आहे. 

ठळक मुद्देवर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देण्याव्यतिरिक्त फ्लिपकार्टने 'Covid Care Leaves'  ची देखील घोषणा केली आहे.

नवी दिल्ली : कोरोनावरील लस पुढील एक-दोन महिन्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाचे आगामी काळात संकट कमी होईल, अशी आशा सर्वांनी वाटत असेल. मात्र, अद्यापही कोरोनाबाबत सावधानता बाळगली पाहिजे. त्यामुळे काही कंपन्यांनी अद्यापही 'वर्क फ्रॉम होम' सुरुच ठेवले आहे. 

दरम्यान, आता ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने आपल्या १२ हजार कर्मचार्‍यांना घरून काम करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आता हे कर्मचारी ३१ मे २०२१ पर्यंत 'वर्क फ्रॉम होम' पॉलिसीअंतर्गत घरातूनच काम करणार आहेत. फ्लिपकार्टने आपला 'बँक टू ऑफिस प्लॅन' चा दुसरा टप्पा पुढील वर्षी मे पर्यंत थांबवला आहे. काही दिवसांपूर्वी अॅमेझॉनने देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी 'वर्क फ्रॉम होम'चा कालावधी जून २०२१ पर्यंत वाढवला होता.

गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही पूर्णपणे काम करताना, सहकार्य करताना आणि आशावादी राहण्यासाठी नवीन पद्धतींचा अवलंब करताना या काळात कोरोनाशी लढण्यासाठी खूप लवचिकता दाखवली आहे. कर्मचाऱ्यांच्या सकारत्मकतेसाठी लीडरशीप टीमला खूप अभिमान वाटत आहे, असे फ्लिपकार्टच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.

बिझनेस स्टँडर्डने आपल्या एका रिपोर्टमध्ये यासंदर्भात माहिती दिली आहे. फ्लिपकार्टने अशा कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलावणे चालू ठेवले आहे, ज्यांना रोस्टर बेसिसवर आधीपासूनच ऑफिसमधून काम करावे लागत आहे. तर इतर सर्व कर्मचारी घरातून काम करतील. तसेच, ऑफिसमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांना गाइडलाइन आणि प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

याचबरोबर, फ्लिपकार्टचे चीफ पीपल्स ऑफिसर कृष्णा राघवन यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या एका मेलमध्ये असे म्हटले आहे की, आम्ही लवकरात लवकर एकमेकांना भेटू इच्छित आहोत. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता येणाऱ्या काळात याची आशा दिसत नाही आहे. स्वत:ला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी सोशल डिस्टंसिंग आणि अन्य नियमांचे पालन करणे योग्य असेल.

कोव्हिड लीव्ह पॉलिसीवर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देण्याव्यतिरिक्त फ्लिपकार्टने 'Covid Care Leaves'  ची देखील घोषणा केली आहे. जर एखादा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला तर या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना २८ दिवसांची सुट्टी देखील मिळेल. ही सुट्टी पेड लीव्ह स्वरुपात असेल, म्हणजेच या सुट्टीचे पैसे देखील कापले जाणार नाहीत. 

टॅग्स :फ्लिपकार्टकोरोना वायरस बातम्याव्यवसाय