Join us  

उसाला दोन हजारांची पहिली उचल आवश्यक

By admin | Published: December 26, 2014 1:10 AM

उसाचे गाळप सुरू होऊन दोन महिने उलटले असून जिल्ह्यात आतापर्यंत ३५ लाख मेट्रिक टनाचे गाळप पूर्ण झाले आहे.

अहमदनगर : उसाचे गाळप सुरू होऊन दोन महिने उलटले असून जिल्ह्यात आतापर्यंत ३५ लाख मेट्रिक टनाचे गाळप पूर्ण झाले आहे. मात्र उत्पादन खर्च निघण्यासाठी कारखानदारांकडून उचित व लाभकारी मूल्यानुसार (एफआरपी) दोन हजार रुपयांप्रमाणे पहिली उचल मिळणे आवश्यक असल्याचे उत्पादकांचे म्हणणे आहे.आर्थिक क्षमता असतानाही अनेक कारखान्यांनी ‘एफआरपी’नुसार दर जाहीर करण्यास टाळाटाळ केली असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे. यंदाच्या हंगामात बारा सहकारी आणि सात खासगी साखर कारखाने सुरू आहेत. साखर सहसंचालकांनी यंदा शंभर लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. जिल्ह्यातील कारखाने एफआरपीनुसार पहिली उचल देतात की नाही, याबाबत सहाय्यक संचालकांनी कार्यवाही करण्याची गरज असताना ते बघ्याची भूमिका घेत असल्याचे शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे. शिखर बँकेने साखरेच्या दरानुसार साखर कारखान्यांना दिली जाणारी उचल घटविल्याने अनेक कारखान्यांना एफआरपीनुसार दर देणे कठीण झाले आहे. मात्र उसाचा प्रतिटन उत्पादन खर्च तीन हजार रुपये आहे. त्यानुसार अनेक साखर कारखाने एफआरपीनुसार पहिली उचल देऊ शकतात. कारखान्यांकडून टाळाटाळ होत असल्याचे शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे. गेल्याच आठवड्यात याप्रश्नी संघटनेतर्फे आंदोलन झाले होते. ९.५ टक्के साखर उतारा असलेल्या उसाला सरासरी दोन हजार रुपये मिळणे आवश्यक असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.(प्रतिनिधी)