Join us  

ब्लॅक मनी शोधण्यासाठी ‘आधार’!, बनावट खाती पकडण्यास होणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 4:42 AM

बँक खाती आधारशी जोडल्यामुळे मनी लाँड्रिंग करणारे तसेच बनावट बँक खाती असणारे लोक पकडण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय कायदा व आयटीमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले.

नवी दिल्ली : बँक खाती आधारशी जोडल्यामुळे मनी लाँड्रिंग करणारे तसेच बनावट बँक खाती असणारे लोक पकडण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय कायदा व आयटीमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले.आॅब्झर्वर रिसर्च फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सायबर सुरक्षा परिषदेत बोलताना प्रसाद यांनी सांगितले की, आम्ही बँक खाती आधारशी का जोडत आहोत, हे स्पष्ट होणे गरजेच आहे. तुम्ही जर मनी लाँड्रिंग करीत असाल तर आधार जोडणीमुळे पकडले जाल. तुमचे बनावट बँक खाते असेल, तरीही तुम्ही पकडले जाल.रविशंकर प्रसाद म्हणाले की, आतापर्यंत ६0 लाख बँक खाती आधारशी जोडण्यात आली आहेत. थेट लाभ हस्तांतरण योजनेमुळे सरकारचे ५८ हजार कोटी रुपये वाचले आहेत. आधार जोडणी बंधनकारक केल्यामुळे ३ कोटी बनावट गॅस जोडण्या उघडकीस आल्या आहेत. याशिवाय २७ कोटी बनावट रेशन कार्डेही उघडकीस आली आहेत.प्रसाद यांनी सांगितले की, आधार प्लॅटफॉर्मवर दररोज ६ कोटी पडताळण्या (आॅथेन्टिकेशन) पार पाडल्या जातात. डिजिटल गव्हर्नन्स हा एक शासन प्रकार आहे. सरकार अधिकाधिक सेवा आॅनलाइन आणण्यासाठी काम करीत आहे. रुग्णालयांपासून जमीन अभिलेखे व पिकांचे दर अशा सर्वच बाबी आॅनलाइन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.आज भारतीयांनी फेसबुकवर सर्वांत मोठे पाऊल उमटविले आहे. भारत हा मोठी बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे. आम्ही दररोज ५ ते ६ नव्या स्टार्टअपची भर घालत आहोत. मला भारतात स्टार्टअपची नवी लाटच उदयास येत असल्याचे दिसून येत आहे.रविशंकर प्रसाद म्हणाले की, तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यामुळे आमची सायबर सुरक्षा अधिक मजबूत झाली आहे. आम्ही बँकिंग, ऊर्जा, वित्त या क्षेत्रांत ‘सीईआरटी’ची (संगणक आणीबाणी प्रतिसाद पथक) स्थापना केली आहे. आम्ही सायबर ड्रिलला प्रोत्साहन देत आहोत. देशासमोर आव्हान असलेल्या डिजिटल घोटाळ्यांपैकी 0.0६ टक्के घोटाळे आम्ही उघडकीस आणले आहेत.

टॅग्स :बँकआधार कार्डब्लॅक मनी