(करनीती भाग 190 - सी. ए. उमेश शर्मा)अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, १ जुलै २०१७ पासून जीएसटी कायदा लागू झाला आहे. म्हणजेच जीएसटीची शाळा सुरू झाली आहे व व्हॅटच्या शाळेतील शेवटची परीक्षा द्यावयाची आहे. तर या शेवटच्या परीक्षेची तयारी कशी करावयाची ते सांग.कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, शासनाने जीएसटीच्या शाळेतील व्हॅटच्या करदात्याला प्रवेश दिला आहे. परंतु व्हॅटच्या शाळेतील परीक्षा करदात्याला पास करावी लागेल. म्हणजेच व्हॅट कायद्यातील एप्रिल ते जून या तीन महिन्यांचे व्हॅटचे रिटर्न दाखल करावे लागेल. तसेच ज्या करदात्यांना मासिक रिटर्न भरावे लागते त्यांना जून महिन्याचे रिटर्न दाखल करावे लागेल.अर्जुन : कृष्णा, व्हॅटचे रिटर्न कधी दाखल करावे लागेल? कृष्ण : अर्जुना, प्रत्येक करदात्याला व्हॅट व सीएसटीचे एप्रिल ते जून २०१७ चे रिटर्न २१ जुलै २०१७ ला किंवा त्याआधी भरावे लागेल. यामध्ये खरेदी-विक्रीची माहिती तंतोतंत द्यावी लागेल. १ जुलैपासून जीएसटी कायदा लागू झाल्यामुळे जर एखादे खरेदीचे ३० जूनपूर्वीचे बिल नमूद करावयाचे राहिले असेल तर त्याचे क्रेडिट नंतर मिळण्यासाठी अडचणी येतील. तसेच २१ जुलैनंतर व्हॅटचे रिटर्न दाखल केल्यास रु. १ हजाराची लेट फीस द्यावी लागेल. म्हणजेच विद्यार्थ्यांनी वेळेवर परीक्षा दिली तर जीएसटीच्या शाळेमध्ये त्रास होणार नाही.अर्जुन : कृष्णा, करदात्याला जीएसटीमध्ये व्हॅट रिटर्नच्या आधारे क्रेडिट कसे मिळणार आहे? कृष्ण : अर्जुना, जर जूनच्या व्हॅट रिटर्नमध्ये जर क्रेडिट जास्त असेल तर करदात्याला ते जीएसटीमध्ये एसजीएसटीमध्ये क्रेडिट मिळेल. जर करदात्याने व्हॅटच्या रिटर्नमध्ये क्रेडिट असेल तर ते जीएसटीमध्ये घेण्यासाठी फॉर्म टीआरएएन-१ भरून दाखल करावा लागेल. यामध्ये व्हॅट सीएसटी कायद्यातील सी, एच, एफ कॉमर्स येणे बाकी येणे असेल तर नमूद करावे लागेल व त्या फॉर्मची लायबिलीटी या क्रेडिटमधून वजा होईल व उरलेली रक्कम त्या करदात्याच्या जीएसटीच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरमध्ये जमा दिसेल व करदात्या एसजीएसटीच्या लायबिलीटीसमोर ते वापरता येईल. करदात्याला हा फॉर्म ९० दिवसांच्या आत आॅनलाइन शासनाला दाखल करावा लागेल. उदा. व्हॅट जूनच्या रिटर्नमध्ये जर विक्रीवरचा व्हॅट देय रु. १ लाख १० हजार असेल व खरेदीवरील व्हॅट रु. १ लाख ८० हजार असेल तर त्याच्या व्हॅट रिटर्नमध्ये रु. ७० हजार कॅरी फॉरवर्ड राहील व त्याला जीएसटीमध्ये एसजीएसटीचे रु. ७० हजार क्रेडिट मिळेल.अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा? कृष्ण : अर्जुना, जीएसटीमुळे विद्यार्थी एका शाळेतून दुसऱ्या शाळेत जात आहेत. तसे जुन्या शाळेच्या सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. तसेच करदात्याला व्हॅट कायद्यातील रिटर्न, आॅडिट, असेसमेंट, या सर्वांची पूर्तता करावी लागेल. जीएसटीच्या शाळेमध्ये प्रत्येक करदात्याने कायद्याचे पालन करावे अन्यथा कठीण शिक्षण होऊ शकते.
व्हॅटच्या शाळेची शेवटची परीक्षा २१ जुलैला
By admin | Updated: July 16, 2017 23:51 IST