नवी दिल्ली : भारतात थेट परदेशी गुंतवणूक (एफडीआय) २०१६-२०१७ आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत ३० टक्क्यांनी वाढून २१.६२ अब्ज अमेरिकन डॉलर झाली आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत १६.६३ अब्ज अमेरिकन डॉलर एफडीआय मिळाला, असे अधिकाऱ्याने सांगितले. एफडीआय धोरणात दिलेली मोकळीक आणि व्यवसाय करणे सोपे झाल्यामुळे ही गुंतवणूक वाढण्यास मदत झाली आहे. नागरी उड्डयन आणि बांधकाम क्षेत्रात खुलेपणा निर्माण झाल्यामुळे ही गुंतवणूक आणखी वाढेल. कॉम्प्युटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, व्यापार, आॅटोमोबाइल इंडस्ट्री आणि केमिकल्स या क्षेत्रांमध्ये या गुंतवणुकीचा मोठा ओघ आहे. भारताला मॉरिशस, सिंगापूर, नेदरलँड्स व जपानकडून जास्तीतजास्त गुंतवणूक मिळाली आहे. २०१५-२०१६ आर्थिक वर्षात एफडीआय २९ टक्क्यांनी वाढून ४० अब्ज अमेरिकन डॉलरवर गेली. ही गुंतवणूक त्या आधीच्या वर्षात ३०.९३ अब्ज अमेरिकन डॉलर होती.भारताला बंदरे, विमानतळे आणि महामार्ग या पायाभूत सुविधांना व्यापक व बळकट करण्यासाठी १ लाख कोटी डॉलर परदेशी गुंतवणूक लागेल त्यामुळे भारतासाठी अशी गुंतवणूक फार महत्त्वाची आहे. परदेशी गुंतवणूक वाढल्यामुळे देशाच्या बॅलन्स आॅफ पेमेंटची परिस्थिती सुधारून रुपयाची शक्ती वाढवणार आहे.
सहा महिन्यांत एफडीआय ३० टक्क्यांनी वाढली
By admin | Published: November 07, 2016 12:19 AM