Join us  

शेतकरी व्यावसायिक विकास आराखड्यावर ‘पणन’चा भर!

By admin | Published: August 27, 2014 1:50 AM

बाजाराभिमुख व्यवस्थापनासाठी राज्यातील शेतकरी गटांच्या कंपन्या स्थापन करण्यात येत आहेत. प्रथम टप्प्यात ४९ शेतकरी कंपन्यांची स्थापना करण्यात आली आहे

अकोला : बाजाराभिमुख व्यवस्थापनासाठी राज्यातील शेतकरी गटांच्या कंपन्या स्थापन करण्यात येत आहेत. प्रथम टप्प्यात ४९ शेतकरी कंपन्यांची स्थापना करण्यात आली आहे. त्यासाठी व्यावसायिक विकास आराखड्यावर भर देऊन भांडवल उभारणी करण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल उचलण्यात आला आहे. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प राज्यात पणन मंडळाकडून राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी आता बाजाराभिमुख पिके घ्यावीत, यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. ज्या कंपन्या स्थापन झाल्या आहेत, त्या कंपन्यांनी या पद्धतीने नियोजन केले आहे. त्यासाठी ग्रामीण व शहरी असे दोन भाग पाडले आहेत. ग्रामीण भागात शेतमाल गोळा करायचा आणि तो शहरात विकायचा, यासाठी दोन वेगवेगळी केंद्रे तयार करण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील औरंगाबाद व पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यात शेतकरी गटाच्या ४९ कंपन्या उभारण्यात आल्या आहेत. यात १४ शेतकरी गटाच्या कंपन्या एकट्या बुलडाणा जिल्ह्यात आहेत. या शेतकरी गटाच्या कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पणन मंडळ, आत्मा व खासगी कंपन्यांचा सहभाग वाढविण्यात आला आहे. शेतकरी गटांच्या कंपन्यांसाठी भांडवल उभारणीच्या दृष्टिकोनातून राज्याच्या कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. राज्यात एकूण ४०० शेतकरी कंपन्या स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. पहिल्या टप्प्यातील जवळपास १५0 कंपन्या येत्या दोन महिन्यात स्थापन करण्याचे उद्दिष्ट संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील ४९ शेतकरी गट कंपन्या स्थापन झाल्या असून, पणन मंडळ, आत्मा व खासगी कंपन्यांचा यामध्ये सहभाग वाढल्याने शेतकऱ्यांच्या या कंपन्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. या टप्प्यात जिल्ह्याचे उद्दिष्ट येत्या दोन महिन्यात पूर्ण करायचे आहे, असे पणन मंडळाचे तज्ज्ञ प्रशांत चासकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)