Join us  

बाजारात पुन्हा घसरण, सेन्सेक्स २९६ अंकांनी उतरला, विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा मारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:19 AM

जागतिक पातळीवर वाढलेली अनिश्चितता आणि विदेशी भांडवलाचे बहिर्गमन यामुळे सोमवारी शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली.

मुंबई : जागतिक पातळीवर वाढलेली अनिश्चितता आणि विदेशी भांडवलाचे बहिर्गमन यामुळे सोमवारी शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २९६ अंकांनी घसरून एक महिन्याच्या नीचांकावर गेला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ९,९०० अंकांच्या खाली घसरला. शुक्रवारीही शेअर बाजारातही घसरण झाली होती.३० कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स २९५.८१ अंकांनी अथवा ०.९३ टक्क्यांनी घसरून ३१,६२६.६३ अंकांवर बंद झाला. दुपारच्या सत्रात सेन्सेक्स ४०० पेक्षा जास्त अंकांनी खाली आला होता. मात्र, नंतर त्यात थोडी सुधारणा झाली. आधीच्या चार सत्रांत सेन्सेक्सने ५०१.३२ अंक गमावले आहेत. ५० कंपन्यांचा निफ्टी ९१.८० अंकांनी घसरून ९,८७२.६० अंकांवर बंद झाला. दोन्ही निर्देशांकांनी २९ आॅगस्टनंतरची नीचांकी पातळी गाठली.जर्मनीमधील निवडणुकीचा निकाल, रुपयाची घसरण, जागतिक बाजारात ७ महिन्यांच्या उच्चांकावर गेलेल्या कच्च्या तेलाच्या किमती आणि विदेशी गुंतवणूकदारांकडून जोरदार समभाग विक्री ही बाजारातील घसरणीची काही प्रमुख कारणे आहेत, असे जाणकारांनी सांगितले.सेन्सेक्समधील अदाणी पोर्टस्, कोटक बँक, लुपीन, टाटा स्टील, आयटीसी, एमअँडएम यांचे समभाग घसरले. कोल इंडिया आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग वाढले.जपानच्या बाजारात तेजीआशियातील प्रमुख बाजार असलेल्या जपानच्या शेअर बाजारात ०.५० टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. कमजोर येनचा बाजाराला लाभ मिळाला. पंतप्रधान शिंजो आबे यांच्या मुदतपूर्व निवडणुकीच्या घोषणेकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असल्याचे दिसून आले.जर्मनीच्या निवडणुकीचा युरोपीय बाजारांवर परिणामजर्मनीमधील निवडणुकीत चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी सलग चौथ्यांदा सत्ता प्राप्त केली असली, तरी त्यांचा पक्ष या निवडणुकीत कमजोर झाला आहे. अति-उजव्या पक्षांची ताकद वाढल्याचे दिसून आले. याचा युरोपातील बाजारांवर संमिश्र परिणाम होत असल्याचे सकाळच्या सत्रात दिसून आले. पॅन-युरोपीय निर्देशांक स्टॉक्स-६०० आणि युरो झोन ब्ल्यूचीप्स स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.२७ वा. ०.१ टक्क्यांची वाढ दर्शवित होता. फ्रान्सचा कॅक-४० निर्देशांक ०.१ टक्क्यांची घसरण दर्शवित होता. जर्मनीचा डॅक्स मात्र ०.३ टक्क्यांची वाढ दर्शवित होता. इटालीचा मिलानही ०.३ टक्क्यांनी तेजीत होता.सोने १०० रुपयांनी उतरलेनवी दिल्ली : येथील सराफा बाजारात सोमवारी सोने १०० रुपयांनी घसरून ३०,७०० रुपये प्रतितोळा झाले. चांदी मात्र २५० रुपयांनी वाढून ४०,७५० रुपये किलो झाली. सिंगापूर येथील बाजारात सोने ०.४२ टक्क्यांनी घसरून १,२९१.६० डॉलर प्रतिऔंस झाले.

टॅग्स :निर्देशांक