Join us

सहा महिन्यांच्या उच्चांकानंतर घसरण

By admin | Updated: May 2, 2016 00:24 IST

खरेदीच्या पाठिंब्याने संवेदनशील निर्देशांकाने सहा महिन्यांमधील उच्चांकी भरारी घेतल्यानंतर सप्ताहाच्या अखेरीस झालेल्या तुफानी विक्रीमुळे बाजाराच्या निर्देशांकांची दोन आठवडे

- प्रसाद गो. जोशी

खरेदीच्या पाठिंब्याने संवेदनशील निर्देशांकाने सहा महिन्यांमधील उच्चांकी भरारी घेतल्यानंतर सप्ताहाच्या अखेरीस झालेल्या तुफानी विक्रीमुळे बाजाराच्या निर्देशांकांची दोन आठवडे सुरू असलेली उर्ध्वगामी प्रगती थांबली. बाजाराच्या घसरणीला नफ्यासाठी झालेल्या विक्रीबरोबरच आंतरराष्ट्रीय कारणांचीही जोड मिळाली.मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहामध्ये संमिश्र वातावरण होते. सप्ताहाच्या प्रारंभी बाजारात तेजी होती. मात्र उत्तरार्धात विक्रीच्या प्रचंड दबावाने निर्देशांकांमध्ये मोठी घट झालेली दिसून आली. सप्ताहाचा प्रारंभ तेजीने झाला. त्यानंतर निर्देशांकाने सहा महिन्यांतील उच्चांकी स्थान मिळविले. मात्र सप्ताहाच्या अखेरीस तो २३१.५२ अंश म्हणजेच ०.९० टक्क्यांनी खाली येऊन २५६०६.६२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ४९.५० अंशांनी खाली येऊन ७८४९.८० अंशांवर बंद झाला. स्मॉलकॅप या निर्देशांकामध्येही ५८.२५ अंशांनी घट झाली. मिडकॅप २४.२८ अंशांनी वाढून ११०४२.९२ अंशांवर बंद झाला.बाजारातील घसरणीला देशांतर्गत वित्तीय तसेच अन्य कारणांबरोबरच आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील घडामोडीही कारणीभूत ठरल्या. जपानच्या मध्यवर्ती बॅँकेने आपले पतधोरण जाहीर करताना सध्या असलेला उणे व्याजदर कायम राखण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाजही कमी केला. यापाठोपाठ अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनेही व्याजदर कायम राखण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र अमेरिकेची प्रगती चांगली होत असल्याने जून महिन्यात व्याजदरामध्ये वाढ करण्याचे संकेतही दिले. या दोन्ही निर्णयांमुळे आंतरराष्ट्रीय वातावरण नरमले आणि जगभरातील शेअर बाजार खाली आले. त्याचा परिणाम भारतामधील शेअर बाजारांवरही पडला.असे असले तरी परकीय वित्तसंस्थांनी मात्र भारतीय बाजारांमधील आपली खरेदी कायम राखली आहे. या वित्तसंस्थांनी गतसप्ताहामध्ये १२८१.४३ कोटी रुपयांची खरेदी केली.गतसप्ताहात सुरू झालेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या चरणानेही बाजाराला चिंता लावली आहे. पहिल्याच सप्ताहात विरोधी पक्षाने विरोधाची भूमिका जाहीर केल्याने जीएसटीसह अन्य विधेयकांच्या मंजुरीबाबत शंका निर्माण झाली आहे. याचाही बाजारावर नकारात्मक परिणाम झाला.आयसीआयसीआय बँकेच्या बुडीत कर्जांमध्ये मोठी वाढ झाल्याने या बँकेचा तिमाही नफा १५ वर्षांमधील सर्वांत नीचांकी गेला. त्याचप्रमाणे स्टेट बँकेलाही बुडीत कर्जांसाठी मोठी तरतूद करावी लागल्याने बाजारावर विक्रीचा मोठा दबाव आला. बँकांचे समभाग मोठ्या प्रमाणात घसरलेले दिसून आले.आठवड्यातील घडामोडी- केवळ बीएसई मिडकॅप निर्देशांकामध्ये किरकोळ वाढ - जपानने व्याजदर कायम राखले; वाढीच्या अंदाजातही घट- अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर कायम ठेवले. जूनमध्ये वाढीबाबत केले सूतोवाच- आयसीआयसीआय बँकेच्या तिमाही नफ्यामध्ये १५ वर्षांमधील सर्वांत मोठी घट- परकीय वित्तसंस्थांकडून बाजारातील खरेदी सुरूच.