Join us  

आयटी कंपन्यांत नोकरभरती जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:57 AM

आयटी सेवा क्षेत्रातील भारतीय कंपन्या संकटाचा सामना करीत असल्या, तरी या क्षेत्रातील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या (एमएनसी) मात्र जोरात नोकरभरती करीत असल्याचे चित्र समोर आले

नवी दिल्ली : आयटी सेवा क्षेत्रातील भारतीय कंपन्या संकटाचा सामना करीत असल्या, तरी या क्षेत्रातील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या (एमएनसी) मात्र जोरात नोकरभरती करीत असल्याचे चित्र समोर आले आहे. अ‍ॅक्सेंच्युअर, केपजेमिनी, ओरॅकल, आयबीएम, गोल्डमॅन सॅश या बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून भारतात नोकरभरती सुरू आहे.अमेरिकेने एच-१बी व्हिसाचे नियम कडक केल्यानंतर भारतीय आयटी कंपन्या संकटात सापडल्या आहेत. बहुतांश बड्या आयटी कंपन्यांनी नोकरकपात सुरू केली आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांत मात्र याच्या नेमके उलट सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार, अ‍ॅक्सेंच्युअर भारतात ५,३९६ नवे रोजगार निर्माण करीत आहे. अमेरिकेतील रोजगाराच्या तुलनेत हे प्रमाण चौपट, तर पोलंड आणि फिलिपिन्सच्या तुलनेत १२ पट अधिक आहे. फ्रेंच आयटी कंपनी केपजेमिनी भारतात २,६४९ जणांची भरती करीत आहे. कंपनीच्या जगभरातील नोकरभरतीच्या तुलनेत हे प्रमाण ५५ टक्के आहे.ओरॅकल १,१२४ जणांची भरती करीत आहे. अ‍ॅमेझॉनने हजारो जणांची भरती करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे वृत्त गेल्याच आठवड्यात आले होते. अ‍ॅमेझॉनच्या वेबसाइटवर सध्या १,२०८ जागा रिक्त असल्याचे दिसून येत आहे. अन्य बड्या कंपन्यांतील नोकरभरतीचा तपशील असा : आयबीएम (६७५ रिक्त जागा), गोल्डमॅन सॅश (३२०), डेल (२८५), मायक्रोसॉफ्ट (२३५), सिस्को (२२९) आणि फ्रेंच बँक सोसायटी जनरल (१८५). रिक्त जागा वेळोवेळी नव्याने घोषित केल्या जातात. त्यामुळे वर्षभरातील नोकरभरतीचा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे.जागतिक पातळीवरील मोठ्या बहुराष्टÑीय कंपन्यांचा भारतातील ग्लोबल इनहाउस सेंटर्सचा (जीआयसी) महसुलाचा वृद्धीदर १० टक्के आहे. तसेच सुमारे ७,७०,००० लोक या कंपन्यांत काम करतात, असे औद्योगिक संघटना नासकॉमने म्हटले आहे.>देशात ११५0 बहुराष्ट्रीय कंपन्यासल्लागार संस्था झिनोव्हच्या अंदाजानुसार, १,१५० बहुराष्टÑीय कंपन्यांचे भारतात काम चालते. २०१६मध्ये त्यांनी दिलेला एकूण रोजगार ८,१५,००० होता. यंदा त्यात आणखी ३० हजार शुद्ध रोजगारांची (नोकरी सोडून गेलेल्यांना वगळून) भर पडेल, असा अंदाज आहे. या कंपन्यांचे ३५ टक्के जीआयसी बंगळुरूत, तर १५ टक्के राजधानी दिल्लीत आहेत.