Join us

वर्षभर उलटूनही कर्मचार्‍यांचा मिळेना अहवाल

By admin | Updated: May 8, 2014 20:53 IST

बनावट शिफारसपत्रे प्रकरण; १५ कर्मचारी कारवाईच्या कचाट्यात

बनावट शिफारसपत्रे प्रकरण; १५ कर्मचारी कारवाईच्या कचाट्यात
नाशिक : मागील वर्षी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित कुमार यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नऊ बनावट गावतळ्यांची व एका सीमेंट प्लग बंधार्‍याची बनावट शिफारसपत्रे बनविल्या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आता वर्ष उलटूनही संबंधित पोलीस ठाण्याकडून जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाला अहवालच प्राप्त झालेला नसल्याने त्या कर्मचार्‍यांवर कारवाई करता येत नसल्याचे विभागाचे म्हणणे आहे. यासंदर्भात याच प्रकरणातील तत्कालीन निलंबित झालेल्या एका कर्मचार्‍याने यासंदर्भात पाठपुरावा केला असून, या पाठपुराव्यामुळेच लघु पाटबंधारे विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता त्र्यंबक तुकाराम पाटील यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात याच विभागातील तब्बल १५ कर्मचार्‍यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यातील काही कर्मचार्‍यांना त्यावेळी अटकही करण्यात आल्याचे कळते. मात्र नंतर हे प्रकरण दडपण्यात आल्याची चर्चा जिल्हा परिषदेत आहे. मात्र संबंधित कर्मचार्‍याने लघु पाटबंधारे विभागाकडे या कर्मचार्‍यांवर काय कारवाई केली याबाबत विचारणा केल्याने विभागाने अद्याप पोलीस ठाण्याकडून १ ते १५ कर्मचार्‍यांवरील आरोपांचा चौकशी अहवाल प्राप्त न झाल्याने या कर्मचार्‍यांवर कारवाई करता येणार नाही, असे कळविले आहे. या १५ कर्मचार्‍यांवर १८ मार्च २०१३ रोजीच भद्रकाली पोेलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आता वर्ष उलटले तरी संबंधित पोलीस ठाण्याकडून जिल्हा परिषदेला अद्याप अहवाल पाठविण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)