मुंबई : १ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. मात्र आकस्मिक मृत्यूनंतर किंवा निवृत्तीनंतर पेन्शनचे कोणते लाभ मिळणार याबाबत सरकारने कोणतीही स्पष्टता ठेवलेली नाही. त्यामुळे नव्या पेन्शनऐवजी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने केली आहे.नव्या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांच्या पगारातून १० टक्के रक्कम कापली जात आहे. तितकीच रक्कम सरकारने योजनेत भरणे अपेक्षित आहे. मात्र गेल्या १० वर्षांपासून सरकारने पेन्शन योजनेतील रक्कम जमा केली नसल्याची बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. त्यामुळे दीड लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांची रक्कम सरकार कधी भरणार याचा जाब संघटनेने विचारला आहे.
आज आझाद मैदानात मोर्चासरकारचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेने मंगळवारी, १५ मार्चला आझाद मैदानात आक्रोश मोर्चाची हाक दिली आहे. यावेळी सुमारे २५ हजारांहून अधिक शासकीय कर्मचारी आंदोलनात सामील होतील, असा दावा संघटनेने केला आहे.