Join us  

विजेची तूट ४.७ टक्क्यांवर

By admin | Published: October 27, 2014 1:34 AM

देशात एप्रिल ते सप्टेंबर या काळात अधिक मागणीच्या काळात विजेची तूट ४.७ टक्क्यांवर आली आहे. एका अधिकृत आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : देशात एप्रिल ते सप्टेंबर या काळात अधिक मागणीच्या काळात विजेची तूट ४.७ टक्क्यांवर आली आहे. एका अधिकृत आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे.केंद्रीय ऊर्जा प्राधिकरण अर्थात सीईएच्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत अधिक मागणीच्या काळात १,४८,१६६ मेगावॅट विजेची मागणी झाली, पुरवठा १,४१,१६० मेगावॅट एवढा झाला. यावरून या काळात विजेची तूट ७,००६ मेगावॅटवर आल्याचे दिसून येते. उल्लेखनीय बाब म्हणजे, गेल्या वर्षी याच कालावधीत विजेची तूट ४.२ टक्के होती.सीईएच्या आकडेवारीनुसार, ईशान्येकडील राज्यांत या कालावधीत २,३८० मेगावॅट एवढी विजेची मागणी राहिली, तर केवळ २,११२ मेगावॅट एवढाच पुरवठा होऊ शकला. आसाम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश व नागालँड ही ईशान्येकडील राज्ये म्हणून ओळखली जातात. गेल्या वर्षी याच कालावधीत या भागात ८.२ टक्क्यांची वीज तूट होती.आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ व कर्नाटक या दक्षिणेकडील राज्यांत याच काळात ३९,०९४ मेगावॅट विजेची मागणी राहिली, तर पुरवठा मात्र केवळ ३५,६९८ मेगावॅटचाच होऊ शकला. गेल्या वर्षी या अवधीत या भागात १२.५ टक्के वीज तूट नोंदली गेली होती.तसेच दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश व उत्तराखंड या उत्तरेकडील राज्यांत या कालावधीत ५१,९७७ मेगावॅट विजेची मागणी राहिली, तर पुरवठा ४७,६४२ मेगावॅटचाच झाला. गेल्या वर्षी या काळात ६.९ टक्के विजेची तूट निर्माण झाली होती.बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड व ओडिशा या पूर्वेकडील भागांत १६,६२८ मेगावॅट विजेची मागणी झाली, तर पुरवठा १६,३४२ मेगावॅटवर राहिला. या भागात १.७ टक्के वीज तूट राहिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)