Join us

अकरावर्षीय बालकाने रचला स्वत:च्याच अपहरणाचा डाव

By admin | Updated: November 21, 2014 22:38 IST

टीव्ही मालिकांचा प्रभाव : १३ वर्षीय साथीदाराचा शोध सुरू

टीव्ही मालिकांचा प्रभाव : १३ वर्षीय साथीदाराचा शोध सुरू
ठाणे : दूरदर्शनवरील गुन्हेगारीविषयक मालिका पाहून औरंगाबादमधील एका ११ वर्षीय बालकाने स्वत:च्या अपहरणाचा डाव रचल्याचे ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने समुपदेशनाद्वारे उघडकीस आणले. त्याच्यासह औरंगाबाद सोडणार्‍या १३ वर्षीय साथीदाराचा शोध सुरू आहे.
गरीब कुटुंबातील प्रेम गुडे (११) आणि विठ्ठल कुबेर (१३) अशी या मुलांची नावे असून ते औरंगाबादच्या मुकुंदवाडी परिसरातील ज्ञानेश्वर विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. प्रेम हा सहावीत तर विठ्ठल दहावीत शिकतो. दोघे मंगळवारी शाळेत जाण्याच्या वेळेस घरातून निघाले. पण शाळेत न जाता रेल्वेने ते नाशिकला आले. दोन दिवस नाशिकला राहिल्यानंतर गुरुवारी दोघेही मुंबईत आले.
कुर्ला रेल्वे ट्रॅक वर फिरताना रेल्वे पोलिसांनी त्यांना हटकले. त्यामुळे दोघांची चुकामूक झाली. प्रेम हा अंबरनाथला आला. तेथे तो चाइल्ड प्रोटेक्शन युनिटच्या छाया चोपडे यांना सापडला. त्याची चौकशी केली असता त्याने सुरुवातीला, चौघांनी आपले अपहरण करून मुंबईला आणले आणि त्यांची नजर चुकवून तेथून पळ काढल्याचे, सांगितले़ मात्र, अधिक विचारणा केल्यावर त्याने इंग्लिशच्या शिक्षिका मारतात, असे उत्तर दिले. त्यामुळे काहीतरी बनाव असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यांनी समुपदेशनाचा मार्ग अवलंबून त्यातील सत्य बाहेर काढले
मित्रासोबत आपण पळून आलो असून कुठे हरवल्यास पुन्हा नाशिकला भेटू, असे त्याने मित्राला सांगितल्याची माहिती त्याने दिली. हा बनाव मालिकांमधील काही दृश्ये पाहून रचल्याची कबुली त्याने दिली. त्याच्या सांगण्यावरून तेथील स्थानिक पोलिसांनी संपर्क केला असता तेथे त्याच्या पालकांनी तो हरवल्याची तक्रार केल्याचे पोलिसांनी सांगितले.
-------
प्रेम हा सध्या भिवंडी बालसुधारगृहात आहे़ त्याला नेण्यासाठी औरंगाबाद पोलीस आणि त्याचे पालक ठाण्यात आले असून त्याला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
- कमालउद्दीन शेख, पोलीस उपनिरीक्षक