Join us  

इजिप्तचा कांदा लासलगावात

By admin | Published: August 27, 2014 1:44 AM

कांद्याचे आगर असलेल्या लासलगावमध्ये इजिप्तचा कांदा येऊन धडकल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

मुंबई : कांद्याचे आगर असलेल्या लासलगावमध्ये इजिप्तचा कांदा येऊन धडकल्याने शेतकरी धास्तावले आहेत. मात्र जूनमध्ये कांद्याचे भाव भडकल्यानंतर लासलगावमधील एका ट्रेडिंग कंपनीने ही मागणी नोंदवली होती. संबंधित कंटेनर आॅगस्टमध्ये आल्याचा खुलासा लासलगाव बाजार समितीने केला आहे. लासलगाव येथील जयंतीदास मंगलदास कंपनीच्या (जेएमसी) आवारात इजिप्तहून आयात केलेला कांदा वाळवत ठेवल्याचे निदर्शनास आल्यानंतर शेतकरी धास्तावले. जेएमसीने इजिप्तहून १५ कंटेनर कांदा आयात केला. त्यातील ७ कंटेनरमधील माल मुंबईत उतरविण्यात आला, तर उर्वरित ८ कंटेनरमधील माल लासलगाव येथे आणण्यात आला. इजिप्तचा कांदा लासलगावला उतरविण्यापर्यंतचा त्याचा खर्च किलोमागे २५ रुपये असा आहे. लासलगावात सध्या कांद्याला किलोमागे १५ ते २० रुपये भाव आहे. मग हा कांदा का आयात केला, असा प्रश्न येथील शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचा कोणताही तुटवडा नसताना कांद्याची आयात तर सुरू झाली नाही ना, अशी शंका काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.लासलगाव बाजार समितीचे अध्यक्ष व नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, संबंधित कांद्याची मागणी जूनमध्येच नोंदविली होती. जूनमध्ये कांद्याचे दर किलोमागे ४० ते ५० रुपयांच्या घरात गेले होते, त्यामुळे आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये कांद्याचे दर आणखी भडकू शकतील, या शक्यतेने ‘जीएमसी’ने ४५० टन कांदा इजिप्तहून आयात करण्याचा निर्णय घेतला होता. तो माल आॅगस्टमध्ये आल्याचा खुलासा त्यांनी केला.तिखटपणा अधिक इजिप्तच्या कांद्यात अधिक ओल असल्याने तो फॅनच्या हवेत सुकविण्यात येत आहे. भारतीय कांद्याच्या तुलनेत त्यात अधिक तिखटपणा आहे. मध्यंतरी युरोपचा कांदा आयात करण्यात आला होता; मात्र त्यात अजितबातच तिखटपणाच नसल्याने तो कांदाही भारतीयांना आवडत नाही. (प्रतिनिधी)