नवी दिल्ली : सराफा बाजारात चार दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीला गुरुवारी ब्रेक लागला. राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोने १२0 रुपयांनी वाढून २५,३७0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. मोठ्या घसरगुंडीमुळे उतरलेल्या भावाचा लाभ उठविण्यासाठी ज्वेलरांनी खरेदी वाढविली. तसेच किरकोळ खरेदीदारांनीही गर्दी केली. त्यामुळे सोन्याचा भाव वाढला. चांदीच्या भावातही सुधारणा दिसून आली. २३0 रुपयांच्या वाढीसह चांदी ३४,३३0 रुपये किलो झाली. व्यापाऱ्यांनी सांगितले की, जागतिक बाजारात गेल्या १0 दिवसांपासून सलग घसरण होत होती. आज ११ व्या दिवशी घसरगुंडी थांबली. तब्बल दोन दशकांनंतर एवढी दीर्घ घसरगुंडी बाजारात दिसून आली. सोने तब्बल ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेले होते. त्यातच आज चीनकडून सोन्याची मागणी वाढली. स्थानिक बाजारांतील मागणीचा तिला आधार मिळाला. त्या बळावर सोने वाढले.लंडनमधील सोन्याचा भावाचा भारतीय सोन्याच्या भावावर परिणाम होतो. लंडनमध्ये पाच वर्षांच्या नीचांकी पातळीवर असलेले सोने गुरुवारी 0.८ टक्क्याने वाढून १,१0२.६८ डॉलर प्रति औंस झाले. अशा प्रकारे सोने पुन्हा १,१00 डॉलरच्या पातळीच्या वर चढले. लंडनमध्ये चांदीचा भाव 0.४४ टक्क्याने वाढून १४.८६ डॉलर प्रति औंस झाला. सोमवारी सोने १,0८६.१८ डॉलर प्रति औंस झाले होते. २0१0 नंतरची ही सर्वाधिक नीचांकी पातळी ठरली होती. अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढविले जाण्याची शक्यता व्यक्त होत असल्यामुळे सोने घसरत होते. किमती आणखी घसरण्याची भीती गोल्डमॅन सॉक्सने व्यक्त केली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
घसरणीला ब्रेक; सोने १२0 रुपयांनी महागले
By admin | Updated: July 24, 2015 00:07 IST