Join us  

वारंवार विचारू नका; घटेल कर्जाची पत!

By admin | Published: May 13, 2016 4:42 AM

तुम्हाला कर्ज अथवा क्रेडिट कार्ड हवे असेल तर एकावेळी एकापेक्षा जास्त बँकांचा शोध घेणे टाळा, अन्यथा कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळणे जिकिरीचे होऊ शकेल! वाचायला थोडे विचित्र वाटेल

मनोज गडनीस,  मुंबईतुम्हाला कर्ज अथवा क्रेडिट कार्ड हवे असेल तर एकावेळी एकापेक्षा जास्त बँकांचा शोध घेणे टाळा, अन्यथा कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळणे जिकिरीचे होऊ शकेल! वाचायला थोडे विचित्र वाटेल पण, एका कर्जासाठी एकापेक्षा जास्त बँकांमध्ये विचारणा करणे, एकाचवेळी वेगवेगळ्या बँकांत कर्जासाठी अर्ज करणे, यामुळे तुमची कर्जाची पत घटू शकते. क्रेडिट पॉइंट कमी होऊ शकतात. कर्जाची पत जोखणाऱ्या, त्याचे विच्छेदन करून ती बँका व वित्तीय संस्थांना उपलब्ध करून देणाऱ्या पतनिर्धारण संस्थांच्या नियमात झालेल्या बदलामुळे आता असे होण्याची शक्यता वाढली आहे. प्रत्येक व्यक्तीचे आर्थिक व्यवहार जोखून त्यानुसार त्याच्या आर्थिक कुवतीचा अहवाल पतनिर्धारण संस्थेतर्फे तयार केला जातो व त्यात नियमित अपडेट केले जातात. संबंधित व्यक्तीने जर कर्ज अथवा क्रेडिट कार्डासाठी अर्ज केला तर, जिथे अर्ज केला आहे, अशा संस्था पतनिर्धारण करणाऱ्या संस्थेकडे त्या व्यक्तीचा ‘क्रेडिट इन्फॉर्मेशन अहवाल’ मागतात. या अहवालाच्या पडताळणीनंतर त्या व्यक्तीच्या कर्जाच्या अर्जावर विचार करण्यात येतो. परंतु, अलीकडच्या काळात थकीत कर्जाचे वाढलेले प्रमाण आणि त्यातून सावधगिरीचे जे उपाय योजले गेले आहेत, त्याचाच एक भाग म्हणून, एखाद्या व्यक्तीच्या क्रेडिट रिपोर्टची जर मागणी झाली तर त्या प्रत्येक मागणीनुसार क्रेडिट पॉइंट कमी करण्याची व्यवस्था विकसित करण्यात आली आहे. याचाच अर्थ, जर एखाद्याने एका कर्जासाठी पाच बँकांकडे अर्ज केला तर, त्या पाचही बँका स्वतंत्रपणे त्या व्यक्तीच्या कर्जाची पत, पतनिर्धारण संस्थेच्या अहवालाच्या मार्फत पडताळून पाहतील. मात्र, असे करताना प्रत्येक बँकेला ही माहिती देताना संबंधित व्यक्तीच्या कर्जाचे पॉइंट कमी होणार आहेत. परिणामी, पाच बँकांना माहिती दिल्यास पाच वेळा पॉइंट कमी होत, कर्जाची पत कमी होणार आहे. यामागे आणखी एक तर्क या कंपन्यांनी जोडला आहे. तो म्हणजे, सध्या कोणत्याही बँकांचे कर्जाचे दर हे एकसारखेच आहेत. तरी ज्या वेळी एखादी व्यक्ती एकापेक्षा जास्त ठिकाणी कर्जासाठी अर्ज करते त्या वेळी तिला कर्जाची नितांत निकड असते. नेमक्या याचवेळी बँका त्या व्यक्तीच्या क्रेडिट रिपोर्टसोबतच त्या व्यक्तीने भूतकाळात घेतलेली कर्ज आणि त्याची परतफेड कशी केली, याचा सखोल अभ्यास करतात. या सर्वांचा परिणाम म्हणून अशावेळी कर्ज नाकारण्याची शक्यता अधिक निर्माण होते. वित्तीय व्यवहाराच्या प्रत्येक ठिकाणी पॅन कार्ड अनिवार्य करण्यात आल्यामुळे या प्रत्येक ठिकाणी होणारे व्यवहार याची कर्जाची पत ठरविण्याच्या दृष्टीने सिबिलच्या सर्व्हरमध्ये नोंद होत असते. यामध्ये केवळ ग्राहकांनी घेतलेले कर्जच नव्हे, तर अगदी मोबाइल, विजेचे बिल किंवा क्रेडिट कार्डावर केलेले व्यवहार आणि जिथे जिथे पॅन कार्ड दिले आहे, अशा ठिकाणचे व्यवहार यांची नोंद होते.या संकलित माहितीचे विच्छेदन आणि विश्लेषण करून संबंधित व्यक्तीची कर्ज घेण्याची क्षमता, ती फेडण्याची क्षमता, कर्ज फेडण्याची वृत्ती असे आर्थिक आणि मानसिक विश्लेषणही केले जाते.कर्ज नाकारण्याच्या या घटना प्रामुख्याने दोन-तीन प्रकारांत दिसल्या आहेत. एकाच कर्जासाठी अधिकाधिक बँकांमध्ये अर्ज करणे, दुसरे म्हणजे क्रेडिट कार्डासाठी विविध बँकांत अर्ज करणे, तिसरा मुद्दा, एकाचवेळी गृह व वाहन किंवा एखादे कर्ज आणि क्रेडिट कार्ड, तसेच दोन वेगवेगळ्या प्रकारची कर्ज दोन महिन्यांच्या अंतरात घेण्याचा प्रयत्न केला तरी ही समस्या उद्भवू शकते.