नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीमार्फत मोठ्या प्रमाणावर निधी मिळविण्याच्या सरकारच्या योजनेचा प्रारंभ चालू महिन्यापासूनच होण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. सरकार स्टील अॅथॉरिटी आॅफ इंडिया लिमिटेड (सेल) मधील ५ टक्के समभागांची विक्री करणार असून, त्यासाठी परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याची योजना आखण्यात येत आहे.नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून सुमारे ६४ हजार कोटी रुपये उभारण्याचा मानस अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. या विक्रीचा प्रारंभ चालू महिन्यात होण्याची शक्यता आहे. स्टील अॅथॉरिटी आॅफ इंडियाचे ५ टक्के भागभांडवल विक्रीला काढून निर्गुंतवणुकीचा शुभारंभ होण्याची शक्यता दिसत आहे. सिंगापूर, हाँगकाँग येथील गुंतवणूकदारांना त्यासाठी आकर्षित करण्यात येणार असून, अन्य ठिकाणीही प्रयत्न केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. स्टील अॅथॉरिटीच्या समभागांची निर्गुंतवणूक करण्याची योजना केंद्रीय मंत्रिमंडळाने या आधीच मंजूर केली आहे. ही विक्री होण्याची शक्यता लक्षात येताच शुक्रवारी सेलच्या समभागांमध्ये ६.०६ टक्क्यांनी घसरण झाली. शुक्रवारी हे समभाग ८२.१५ या किमतीवर बंद झाले. त्याचा विचार करता या विक्रीतून सरकार १७०० कोटी रुपये उभारू शकते. याशिवाय कोल इंडियाच्या समभागामध्येही २.३४ टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे या समभागांच्या विक्रीतूनही सरकारला आता २२ हजार कोटी रुपये मिळू शकतात. सरकारी आस्थापनांमधील निर्गुंतवणुकीत परदेशातील गुंतवणूकदारांनी सहभाग घ्यावा यासाठी सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये प्रयत्न केले जात आहे. याशिवाय अन्य काही ठिकाणीही प्रयत्न केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
निर्गुंतवणुकीला चालू महिन्यातच सुरुवात होणार
By admin | Updated: July 17, 2014 00:02 IST