Join us  

महाराष्ट्रात डाळीचे उत्पादन झाले दुप्पट! सरकारचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 12:43 AM

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : महाराष्ट्रातील शेतकरी ‘आम्हाला कर्जमुक्त करा आणि शेतमालाला जास्त भाव द्या’, अशा मागण्या रस्त्यावर येऊन करीत असताना राज्यात अन्नधान्य आणि डाळींचे उत्पादन दुप्पट झाल्याचा सरकारचा दावा आहे. यात सगळ्यात जास्त पीक औरंगाबाद, नाशिक, लातूर, अहमदनगर आणि जळगाव विभागात झाले आहे.कृषी राज्यमंत्री एस.एस. अहलुवालिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात तीन हजार ६६८ टन डाळी आणि १५ हजार १२० टन खाद्यान्नाचे उत्पादन झाले आहे. २०१५-१६ वर्षात राज्यात डाळी आणि खाद्यान्नाचे उत्पादन अनुक्रमे १५४४.७ आणि ८७५४.४ टन झाले होते.शिवसेनेचे संजय जाधव यांनी विचारलेल्या प्रश्नावर लेखी उत्तरात मंत्री म्हणाले की, कमी पाऊस, अवकाळी पाऊस, गारांचा पाऊस व विपरीत हवामानामुळे २०१४-१५ आणि २०१५-१६ वर्षात खाद्यान्नाचे उत्पादन कमी झाले, परंतु २०१६ मध्ये सामान्य पर्जन्यमान आणि सरकारच्या पुढाकारामुळे २०१६-१७ च्या आगाऊ अनुमानानुसार देशात दर हेक्टरी खाद्यान्नाचे उत्पादन २,१४२ किलोग्रॅम झाले आहे. याआधी २०१४-१५ व २०१५-१६ मध्ये हेच उत्पादन अनुक्रमे २,०२८ व २,०४२ किलोग्रॅम दर हेक्टरी होते.२०१५-१६ वर्षात कमी उत्पादनाच्या क्षेत्रात प्रोत्साहन दिले जाण्याच्या प्रश्नावर अहलुवालिया म्हणाले की, राज्य सरकारांच्या माध्यमातून राष्ट्रीय खाद्यान्न सुरक्षा मिशन, राष्ट्रीय कृषी विकास योजना, सतत कृषी मिशन, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, मृदा स्वास्थ्य कार्डसारख्या योजना राबवल्या जात आहेत. याशिवाय शेतकऱ्यांच्या पिकांच्या किमान आधारभूत किमतीतही वाढ केली गेली आहे.