Join us

धुळे मर्चंटस् को-आॅप. बँकेस टाळे!

By admin | Updated: September 11, 2014 02:34 IST

आर्थिकदृष्ट्या पार डबघाईला आलेल्या धुळे येथील दि मर्चंट्स को. आॅप. बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केला

मुंबई : आर्थिकदृष्ट्या पार डबघाईला आलेल्या धुळे येथील दि मर्चंट्स को. आॅप. बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केला असून बँकेवर अवसायक (लिक्विडेटर) नेमून तिचा रितसर गाशा गुंडाळण्याची कारवाई सुरु करावी, असे निर्देश राज्याच्या सहकारी संस्था निबंधकांना दिले गेले आहेत.या बँकेस बँकिंग व्यवसाय करण्यासाठी बँकिंग नियमन कायद्यान्वये २८ वर्षांपूर्वी दिलेला परवाना यंदाच्या ३० आॅगस्टपासूनच्या पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करण्यात आला आहे. तसेच रीतसर गाशा गुंडाळल्यावर बँकेच्या ठेवीदारांना ‘डिपॉझिट इन्श्युरन्स अ‍ॅण्ड क्रेडिट गॅरेंटी कॉर्पोरेशन’कडून फक्त एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींचा परतावा मिळू शकेल, असे रिझर्व्ह बँकेने बुधवारी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.धुळे मर्चंट्स बँकेचे पुनर्वसन करण्याचे नानिविध प्रयत्न गेली ११ वर्ष सुरु होते. परिस्थिती आणखी बिघडू नये यासाठी रिझर्व्ह बँकेने डिसेंबर २०१२ पासून बँकेवर अनेक निर्बंध लागू केले. तरीही परिस्थिती सुधारली नाही. अशा परिस्थितीत ही बँक अन्य एखाद्या बँकेत विलिन करण्याचा अथवा अन्य मार्गाने तिचे पुनरुज्जीवन करण्याचा कोणताही ठोस पर्याय नसल्याने, खातेदारांचे हित जपण्यासाठी या बँकेचा बँकिग परवाना रद्द करण्याचा टोकाचा निर्णय घेण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे.परवाना रद्द झाल्याने धुळे मर्चंट्स बँकेस कोणत्याही प्रकारचे बँकिंग व्यवहार करण्यास पूर्णपणे प्रतिबंध असेल. बँकेच्या ठेवीदारांना त्यांच्या एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींचा परतावा देण्याची प्रक्रिया, विमा योजनेच्या नियमांनुसार, लवकरच सुरु करण्यात येईल, असेही रिझर्व्ह बँकेने नमूद केले आहे. (विशेष प्रतिनिधी)