DGCA Compensation Rules : सध्या देशभरात इंडिगो कंपनीच्या गलथान कारभारामुळे हवाईप्रवासी त्रस्त झाले आहेत. रोज शेकडोने हवाई उड्डाणे रद्द होत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत तुमची फ्लाईट लेट झाली किंवा कॅन्सल झाली तर नुकसान भरपाई मिळते का? हे अनेकांना माहिती नाही. ऑगस्ट २०१९ मध्ये डीजीसीएने फ्लाईट उशीरा झाल्यास, रद्द झाल्यास किंवा ओवरबुकिंगमुळे प्रवाशाला प्रवेश नाकारल्यास प्रवाशांना मिळणाऱ्या मोबदल्याचे नियम अधिक कडक केले आहेत.
डीजीसीएचे नियम काय आहेत?
डीजीसीएने तयार केलेले हे नियम सिव्हिल एव्हिएशन रिक्वायरमेंट अंतर्गत येतात. या नियमांनुसार, जर एअरलाइन नियोजित वेळेनुसार काम करू शकली नाही, तर त्यांना प्रवाशांना एकतर मोबदला द्यावा लागेल किंवा त्यांच्यासाठी दुसऱ्या प्रवासाची व्यवस्था करावी लागेल. मोबदल्याची रक्कम विलंबाचा कालावधी किंवा कॅन्सलेशनच्या किती वेळ आधी सूचना दिली, यावर अवलंबून असते.
१. फ्लाईट लेट झाल्यास काय नियम?
तुम्ही वेळेवर चेक-इन केले असेल आणि विमानतळावर पोहोचल्यावर फ्लाईट लेट झाल्याचे कळले, तर एअरलाइन्स तुम्हाला खालील मोबदला देण्यासाठी बांधील आहेत.
| फ्लाईटचा कालावधी | विलंबाचा कालावधी | प्रवाशांना मिळणारी सुविधा |
| अडीच तासांपर्यंत | २ तास किंवा त्याहून अधिक | मोफत भोजन आणि रिफ्रेशमेंट |
| २.५ ते ५ तास | ३ तास किंवा त्याहून अधिक | मोफत भोजन आणि रिफ्रेशमेंट |
| ५ तासांपेक्षा जास्त | ४ तास किंवा त्याहून अधिक | मोफत भोजन आणि रिफ्रेशमेंट |
६ तासांपेक्षा जास्त विलंब : डोमेस्टिक फ्लाईटमध्ये ६ तासांपेक्षा जास्त विलंब झाल्यास, एअरलाइन्सने प्रवाशांना २४ तास आधी माहिती देणे बंधनकारक आहे. तसेच ६ तासांच्या आत दुसरी पर्यायी फ्लाईट किंवा तिकिटाचा संपूर्ण परतावा देण्याचा पर्याय दिला पाहिजे.
२४ तासांपेक्षा जास्त विलंब : जर फ्लाईटला २४ तासांपेक्षा जास्त विलंब झाला, किंवा रात्री ८ ते पहाटे ३ वाजेपर्यंतच्या फ्लाईटला ६ तासांपेक्षा जास्त विलंब झाला, तर एअरलाइन्सला प्रवाशांसाठी हॉटेलची व्यवस्था करावी लागते.
२. फ्लाईट कॅन्सल झाल्यास मोबदला
एअरलाइन्सकडून कॅन्सलेशनची माहिती प्रवाशांना किमान २ आठवडे आधी मिळणे आवश्यक आहे. यासह, प्रवाशांना पर्यायी फ्लाईट किंवा संपूर्ण रिफंडचा पर्याय दिला जातो. जर सूचना न देता फ्लाईट रद्द झाली किंवा वेळेवर माहिती न मिळाल्याने तुमची कनेक्टिंग फ्लाईट चुकली, तर मोबदला मिळतो.
| ब्लॉक टाईम (प्रवासाचा कालावधी) | मोबदला रक्कम |
| १ तासापर्यंत | ५,००० रुपये किंवा एकतर्फी भाडे + इंधन शुल्क |
| १ ते २ तास | ७,५०० रुपये किंवा एकतर्फी भाडे + इंधन शुल्क |
| २ तासांपेक्षा जास्त | १०,००० रुपये किंवा एकतर्फी भाडे + इंधन शुल्क |
दुसऱ्या एअरपोर्टचा खर्च : जर एअरलाइनने दुसऱ्या एअरपोर्टवरून उड्डाण करणारी पर्यायी फ्लाईट दिली, तर त्या एअरपोर्टपर्यंत जाण्याचा खर्चही एअरलाइनला उचलावा लागतो.
३. ओवरबुकिंगमुळे बोर्डिंग नाकारल्यास
जेव्हा फ्लाईटमध्ये जागा कमी असल्यामुळे कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशाला बोर्डिंग नाकारले जाते, तेव्हा त्यास ओवर-बुकिंग म्हणतात. अशा वेळी एअरलाइनला मोबदल्याच्या बदल्यात जागा सोडणाऱ्या स्वयंसेवकांना शोधावे लागते.
| पर्यायी फ्लाईटची व्यवस्था | मोबदल्याची रक्कम |
| २४ तासांच्या आत | मूळ एकतर्फी भाड्याच्या २००% + इंधन शुल्क |
| २४ तासांनंतर | मूळ एकतर्फी भाड्याच्या ४००% + इंधन शुल्क |
| पर्यायी फ्लाईट नाकारल्यास | तिकिटाचा संपूर्ण रिफंड + मूळ एकतर्फी भाड्याच्या ४००% + इंधन शुल्क |
४. मोबदला आणि रिफंड क्लेम कसा करायचा?
मोबदला क्लेम करण्यासाठी बोर्डिंग पास, तिकीट, बुकिंग आयडी आणि एअरलाइनकडून मिळालेली सर्व माहिती, तसेच खाणे-पिणे आणि हॉटेलच्या पावत्या जवळ ठेवा.
एअरलाइनच्या तक्रार पोर्टलवर तक्रार दाखल करा. नियमांनुसार, ३० दिवसांच्या आत तक्रार निकाली काढणे बंधनकारक आहे.
एअरलाइनने समस्या सोडवण्यास नकार दिल्यास, तुम्ही नागरी उड्डाण मंत्रालयाच्या 'एयर सेवा' पोर्टलवर तुमची तक्रार नोंदवू शकता.
रोख रक्कम भरल्यास रिफंड त्वरित मिळतो. क्रेडिट कार्डने भरल्यास ७ दिवसांच्या आत आणि ट्रॅव्हल एजंटद्वारे बुकिंग केल्यास एजंटकडून रिफंड दिला जातो.
वाचा - एव्हिएशन क्षेत्रात मोठी मागणी! कोणत्या एअरलाइनकडे किती पायलट? संसदेत आकडेवारी सादर
खराब हवामान, सुरक्षा कारणे, नैसर्गिक आपत्ती किंवा राजकीय अशांतता यांसारख्या एअरलाइनच्या नियंत्रणाबाहेरील परिस्थितीत मोबदला देण्याची किंवा हॉटेल सुविधा देण्याची जबाबदारी एअरलाइनवर नसते.
