Join us  

दीड महिन्यानंतर प्रथमच निफ्टीमध्ये घट

By admin | Published: June 19, 2017 1:25 AM

नवनवीन उच्चांक नोंदविणाऱ्या बाजाराच्या निर्देशांकांनंतर आता बाजारात करेक्शन येऊ लागले आहे. सुमारे दीड महिन्यानंतर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)मध्ये

शेअर समालोचन प्रसाद गो. जोशीनवनवीन उच्चांक नोंदविणाऱ्या बाजाराच्या निर्देशांकांनंतर आता बाजारात करेक्शन येऊ लागले आहे. सुमारे दीड महिन्यानंतर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)मध्ये घट झाली आहे. तर मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक दुसऱ्या सप्ताहात खाली येऊन बंद झाला आहे. आगामी काळातील मान्सूनची वाटचाल आणि जीएसटीच्या अंमलबजावणीची कृती यावरच बाजाराची दिशा ठरणार आहे.सप्ताहाच्या पूर्वार्धामध्ये वाढत असलेला मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक उत्तरार्धामध्ये मात्र घसरणीला लागला. सप्ताहाच्या अखेरीस तो मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकापेक्षा २०५.६६ अंशांनी खाली येऊन ३१०५६.४० अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहामध्येही या निर्देशांकामध्ये घसरण झाली होती.कोणतीही महत्त्वपूर्ण घटना, घडामोड नसल्यामुळे राष्ट्रीय शेअर बाजारामध्येही मंदीचे वातावरण होते. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) हा हेलकावत होता. मात्र, त्यात काही फारसा जोर नव्हता. सप्ताहाच्या अखेरीस तो मागील बंद निर्देशांकापेक्षा ८०.२० अंशांनी खाली येऊन ९५८८.०५ अंशांवर बंद झाला. गेले सहा सप्ताह हा निर्देशांक सातत्याने वाढत होता. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये मात्र, वाढ झालेली दिसून आली.परकीय वित्तसंस्थांनी बाजारातील करेक्शन ओळखून विक्रीला प्रारंभ केला आहे. माहिती तंत्रज्ञान आणि औषधनिर्माण आस्थापनांमध्ये मोठी घसरण झाली.आगामी सप्ताहामध्ये कोणत्याही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी अपेक्षित नसल्यामुळे देशातील मान्सूनची आगेकूच आणि जीएसटीच्या अंमलबजावणीमध्ये होणाऱ्या प्रगतीवरच चढउतार अवलंबून राहणार आहे. जगभरातील शेअर बाजारांमध्ये काही महत्त्वाची घडामोड झाल्यासही त्याचा परिणाम भारतामधील शेअर बाजारांवर होऊ शकतो.