Join us

कच्च्या तेलाच्या आयातीवर पुन्हा लागणार सीमा शुल्क

By admin | Updated: February 17, 2015 00:28 IST

आयात होणाऱ्या कच्च्या तेलावर येत्या अर्थसंकल्पात पाच टक्के सीमा शुल्क लागू होण्याची शक्यता आहे. हा निर्णय झाल्यास सरकारला तीन अब्ज डॉलरचा जास्तीचा महसूल उपलब्ध होईल.

नवी दिल्ली : आयात होणाऱ्या कच्च्या तेलावर येत्या अर्थसंकल्पात पाच टक्के सीमा शुल्क लागू होण्याची शक्यता आहे. हा निर्णय झाल्यास सरकारला तीन अब्ज डॉलरचा जास्तीचा महसूल उपलब्ध होईल. सध्या कच्च्या तेलाच्या आयातीवर कोणतेही शुल्क नाही; परंतु देशांतर्गत उत्पादन होणाऱ्या तेलावर दोन टक्के केंद्रीय विक्रीकर लागू आहे. ही परिस्थिती देशी उत्पादकांसाठी अनुकूल नाही. कच्च्या तेलाची २० टक्के मागणी देशांतर्गत उत्पादनातून भागविली जाते व त्यावर कर लागू आहे व आयात होणारे ८० टक्के तेल आज करमुक्त आहे. ही विसंगती दूर करण्याचा प्रयत्न अर्थमंत्री अरुण जेटली येत्या अर्थसंकल्पात करतील, असे सूत्रांनी सांगितले. अर्थमंत्रालयासमोर आज जे पर्याय उपलब्ध आहेत त्यापैकी देशांतर्गत उत्पादित कच्च्या तेलावर लागू असलेला केंद्रीय विक्रीकर मागे घेणे. तसे झाल्यास तेल शोध कंपन्यांना प्रोत्साहन मिळेल. आज जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत घसरली आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन सरकार कच्च्या तेलावर पुन्हा सीमा शुल्क लागू करू शकते.पाच टक्के सीमा शुल्क आकारल्यास सरकारला दरवर्षी तीन अब्ज डॉलरचा महसूल मिळेल. या महसुलामुळे सरकारला राजकोषीय तोटा कमी करायला मदत मिळेल. सरकारने कच्च्या तेलाच्या देशांतर्गत उत्पादनातून ६.५७ कोटी बॅरलवर केंद्रीय विक्री कराच्या माध्यमातून १२.५ कोटी डॉलर जमा केले होते. आर्थिक वर्ष २०१४-२०१५ च्या पहिल्या १० महिन्यांत ५.३३ कोटी बॅरलवर ८.७ कोटी डॉलर जमविले होते. करप्रणाली सुसंगत करण्यासाठी सीमा शुल्क वाढविण्याचा निर्णय होईल. ४सिंगापूर : अमेरिकेत तेलाचे उत्पादन घटण्याची व्यापाऱ्यांना आशा होती; परंतु विश्लेषकांनी अस्थिर परिस्थिती सतत राहण्याचा इशारा दिल्यामुळे आशियातील बाजारपेठेत तेलाच्या किमती सोमवारी संमिश्र राहिल्या.सकाळच्या व्यवहारात अमेरिकन कंपनी वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटचे (डब्ल्यूटीआय) तेल १५ सेंटस्ने वधारून ५२.९३, तर ब्रेंट क्रूड २७ सेंटस्ने घसरून ६१.२५ अमेरिकन डॉलरवर आले. अमेरिकेतील आणखी काही तेल विहिरी उत्पादन घटविणार असल्याचे आकडेवारी जाहीर होताच डब्ल्यूटीआयचे तेल शुक्रवारी १.५७ व ब्रेंट क्रूड २.२४ सेंटस्ने वाढले होते.अमेरिकेत सध्या सुरू असलेल्या तेल विहिरी १३ फेब्रुवारीच्या आठवड्यात ८४ ने कमी होऊन १,०५६ पर्यंत आल्या, असे अमेरिकेतील तेल विहिरींची माहिती ठेवणाऱ्या बेकर ह्युजेसने म्हटले. ४गेल्या अनेक वर्षांत आयात कच्च्या तेलावर सीमा शुल्क लागू करून कच्च्या तेलाच्या किमतीतील चढउतारामुळे होणारे परिणाम जाणवू न देण्यासाठी व महसूल वाढविण्यासाठी होत आहे.