Join us

एमआरपीचा गोंधळ टळणार

By admin | Updated: July 6, 2017 01:31 IST

जीएसटी लागू झाल्यानंतर वस्तूंच्या किमतींत झालेल्या बदलाविषयीचे नियम केंद्र सरकारने जाहीर केले आहेत. कमाल किरकोळ किमतींबाबत

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जीएसटी लागू झाल्यानंतर वस्तूंच्या किमतींत झालेल्या बदलाविषयीचे नियम केंद्र सरकारने जाहीर केले आहेत. कमाल किरकोळ किमतींबाबत (एमआरपी) विक्रेते आणि ग्राहक यांच्यात असलेला गोंधळ त्यामुळे कमी होईल, असे सूत्रांनी सांगितले.ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव अविनाश श्रीवास्तव यांनी सांगितले की, जीएसटी अंतर्गत उत्पादनाची किंमत वाढली असल्यास उत्पादक, आयातदार अथवा वेष्टनकार (पॅकर) यांनी त्यासंदर्भात किमान दोन वृत्तपत्रांत जाहिरात द्यायला हवी. तसेच सुधारित किमतीचे स्टिकर वस्तूच्या वेष्टनावर लावायला हवे. नवी आणि जुनी अशा दोन्ही किमती वेष्टनावर स्पष्टपणे दिसायला हव्यात. अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी ट्विटवर सांगितले की, नव्या नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. जीएसटी अंतर्गत उत्पादनाची किंमत न सुधारल्यास दुकानदारावर कायदेशीर कारवाई केली जाईल. उत्पादक आणि व्यावसायिक यांच्याकडे असलेला जुना साठा विकण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात येत असल्याची घोषणा रामविलास पासवान यांनी केली. या वस्तूंची विक्री करताना नव्या नियमांचे मात्र नीट पालन करावे लागेल, असे ते म्हणाले. अर्थ मंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, जीएसटी लागू झाल्यानंतर वस्तूंची किंमत कमी झाली असल्यास वृत्तपत्रांत जाहिरात देण्याची गरज नाही. तथापि, वस्तूची नवी कमाल किरकोळ किंमत उत्पादनाच्या वेष्टनावर नमूद करायला हवी. त्याचबरोबर जुनी किंमतही वेष्टनावर दिसली पाहिजे. श्रीवास्तव यांनी सांगितले की, वेष्टनाचे साहित्य महाग असते. त्यामुळे जीएसटी लागू होण्याच्या आधी वेष्टनबंद करण्यात आलेल्या वस्तू नव्या वेष्टनात आणण्याची गरज नाही. जुन्याच वेष्टनावर नवी किंमत टाकून सप्टेंबरपर्यंत या वस्तू विकता येतील. वेष्टनावर स्टिकर चिकटवून नवी किंमत टाकता येईल. मात्र हे करताना जुनी किंमत झाकणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. स्वस्त झाल्याचा लाभ मिळावाजीएसटीमध्ये वस्तू स्वस्त झाल्यास त्याचा लाभ ग्राहकांना मिळावा यासाठी हा नियम करण्यात आला आहे. वस्तू किती स्वस्त झाली, हे नागरिकांना कळावे यासाठी वस्तूच्या वेष्टनावर नवी आणि जुनी किंमत दिसायला हवी, असा नियम करण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले.