मुंबई : देशातील ई- कॉमर्समध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. चालू वर्षामध्ये आॅनलाईन पद्धतीने सुमारे ६० हजार नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याची माहिती या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांच्या सूत्रांनी दिली आहे. ई- कॉमर्सला चांगले दिवस आले असून, पुढील वर्षात नोकऱ्यांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.देशातील ई- कॉमर्समध्ये कार्यरत असणाऱ्या एका प्रमुख कंपनीने थेट परकीय गुंतवणूक नाकारली असली तरी येत्या वर्षभरात आॅनलाईन पद्धतीने मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. येत्या वर्षभरात सुमारे ६० हजार नवीन नोकऱ्या उपलब्ध होणार असून, २०१५ मध्ये हा आकडा १ लाखापर्यंत जाऊ शकतो, असे या क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले.जागतिक पातळीवर कार्य करणाऱ्या काही कंपन्याही भारतातून नोकरभरती करण्यात इच्छुक आहेत. सध्या या क्षेत्रात १२ अब्ज अमेरिकन डॉलरची उलाढाल होत आहे. सन २०२० पर्यंत ही उलाढाल ७५ अब्ज अमेरिकन डॉलरवर जाण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध होत असल्याचे सांगण्यात येते.ई कॉमर्सचे क्षेत्र आता अधिक विस्तारत असून, काही कंपन्यांनी ५० ते ७५ नवीन ठिकाणी आपल्या शाखा सुरू केल्या असून, त्यामार्फत नोकरभरती होत असल्याचे सांगण्यात येते. (प्रतिनिधी)
येत्या वर्षात निर्माण होणार साठ हजार नोक-या
By admin | Updated: June 18, 2014 05:37 IST