Join us  

‘कोल इंडिया’च्या भागविक्रीचे शेअर बाजाराकडून जोरदार स्वागत

By admin | Published: January 31, 2015 2:21 AM

निर्गुंतवणूक धोरणाअंतर्गत केंद्र सरकारने विक्रीस काढलेल्या कोल इंडिया लिमिटेडच्या समभागाला आज, शुक्रवारी बाजाराने भरभरून प्रतिसाद दिला

मुंबई : निर्गुंतवणूक धोरणाअंतर्गत केंद्र सरकारने विक्रीस काढलेल्या कोल इंडिया लिमिटेडच्या समभागाला आज, शुक्रवारी बाजाराने भरभरून प्रतिसाद दिला आणि सुमारे दीड पट अधिक बुकिंग झाले आहे. या भागविक्रीच्या माध्यमातून सरकारला २२ हजार ६१२ रकोटी रुपयाचे भांडवल प्राप्त झाले आहे. गुरुवारी याची घोषणा झाल्यानंतर शुक्रवारी बाजार उघडताच काही मिनिटातंच कंपनीच्या समभागांना मोठी मागणी प्राप्त झाली. मात्र, परदेशी वित्तीय संस्था, देशी वित्तीय संस्थांनी एकिकडे भरभरून प्रतिसाद दिला असतानाच सामान्य गुंतवणूकदाराकरिता राखीव असलेल्या समभागांना काहीसा थंड प्रतिसाद लाभला. उपलब्ध माहितीनुसार, वित्तीय संस्थांकडून दीड पट बुकिंग झाले. मात्र, सामान्य गुंतवणूकदारांकडून एकूण राखीव समभागापैकी ४२.५० टक्के इतकेच बुकिंग झाले. सामान्यपणे सामान्य गुंतवणूकदाराच्या खात्यात जर जमा रक्कम असेल तर तेवढ्या रकमेचे समभाग खरेदी करता येतात अथवा ते ज्या दलालाच्या माध्यमातून व्यवहार करतात, त्यांनी क्रेडिटद्वारे काही रक्कम दिली तर त्या समभागाची उचल करता येते. दरम्यान, शेअरची किंमत सरकारने ३५८ रुपये निश्चित केली आहे. या किमतीच्या पाच टक्के कमी दराने या शेअरची फ्लोअर प्राईस किंवा किमान विक्री किंमत असेल. सरकार ३१.५८ कोटी शेअर्स (किंवा ५ टक्के मालकी) पब्लिक आॅफर माध्यमातून विकणार आहे. आणखी पाच टक्के शेअर्सची विक्री आॅफर फॉर सेल माध्यमातून केली जाईल. कोल इंडियाने २० टक्के शेअर्स किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखून ठेवले आहेत. या शेअर्सवरही पाच टक्के सूट मिळेल. निर्गुंवणुकीतून सरकारने ४३,४२५ कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य ठरविले असून, कोल इंडियाच्या माध्यमातून हे लक्ष्य अर्ध्यापेक्षा जास्त गाठले जाईल. (प्रतिनिधी)