शेतीक्षेत्रात २०१४ या वर्षाची नोंद हवामान बदलामुळे बसलेल्या जबरदस्त आर्थिक फटक्यासाठी केली जाईल, यात कोणतीही शंका नाही. हवामान बदलाच्या संकटामुळे २०१४मध्ये जगभरात शेतीक्षेत्र व अन्ननिर्मितीच्या कामात मोठी बाधा आली. अवकाळी पाऊस, गारपिटीचा भारतासह महाराष्ट्रालाही फटका बसला. वर्षाच्या सुरुवातीलाच सलग महिनाभर देशभर ठिकठिकाणी गारपीट झाली. त्यामुळे कृषी उत्पादन प्रभावित झाले. अन्नधान्याची मोठी नासाडी झाली. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश अशा जवळपास निम्म्या देशाला अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपले. गारपिटीचे संकट कमी म्हणून की काय यंदा मान्सूनचेही आगमन महिनाभर उशिराने झाले. त्यामुळे पश्चिम व उत्तर भारतात दुष्काळी परिस्थिती आहे. भारताचा भगीरथ प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाक्रा नानगल धरणात यंदा मान्सून सुरू होण्यापूर्वी दरवर्षीपेक्षा खूपच कमी पाणीसाठा शिल्लक होता. यंदाही अपुरा पाऊस झाल्याने पुरेसा पाणीसाठा झालेला नाही, त्यामुळे या धरणाच्या पाण्याचे नियोजन अत्यंत काटकसरीने करावे लागणार आहे. विशेष म्हणजे जलआयोगाच्या माहितीनुसार, यंदा देशातल्या सर्व प्रमुख धरणांमध्ये सरासरीपेक्षा अंदाजे ३० टक्के कमी पाणीसाठा आहे. २०१४मध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने खरीप हंगामात अपेक्षित पेरणी झालेली नाही; तसेच पाण्याअभावी रब्बी पिकाचे क्षेत्रही घटले आहे. महाराष्ट्रातील शेतीची स्थितीही फारशी आशादायक नाही. राज्यात खरिपाच्या उत्पादनाला अंदाजे ५० टक्क्यांपर्यंत फटका बसणार आहे. राज्यात १९ हजारपेक्षा अधिक गावांत टंचाई व दुष्काळी स्थिती आहे.डाळींचे उत्पादन वाढलेअनेक दशकांच्या अथक प्रयत्नानंतर २०१३-१४मध्ये देशात डाळींचे (भरडधान्ये) १९.५७ दशलक्ष टन उत्पादन अपेक्षित आहे. त्यामुळे साहजिकच डाळींची आयातही कमी होण्यास मदत होणार आहे. २०१३-१४मध्ये तांदूळ, गहू, कापूस, साखर, दूध यांचेही विक्रमी उत्पादन झाले.
शेतीपुढे हवामान बदलाचे आव्हान!
By admin | Updated: December 16, 2014 05:01 IST