Join us  

एसबीआयमध्ये विलीन झालेल्या बँकांचे चेकबुक १ जानेवारीपासून ठरणार बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 3:47 AM

स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये (एसबीआय) विलीन झालेल्या सहयोगी बँकांचे चेकबुक ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत बदलणार आहेत. जुने चेकबुक ३१ डिसेंबरनंतर चालणार नाहीत.

नवी दिल्ली : स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये (एसबीआय) विलीन झालेल्या सहयोगी बँकांचे चेकबुक ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत बदलणार आहेत. जुने चेकबुक ३१ डिसेंबरनंतर चालणार नाहीत. विलीनीकरणानंतर या बँकांचा आयएफएससी कोड बदलला आहे. त्यामुळे नव्या आयएफसी कोडसह नवीन चेकबुक घेणे ग्राहकांना बंधनकारक आहे.नव्या चेकबुकसाठी आधी ३० सप्टेंबर २०१७ची मुदत होती. या मुदतीत हे काम पूर्ण होऊ न शकल्याने आता ३१ डिसेंबरची मुदत देण्यात आलेली आहे, असे सूत्रांनी सांगितले. भारतीय महिला बँक, स्टेट बँक आॅफ पतियाळा, स्टेट बँक आॅफ म्हैसूर, स्टेट बँक आॅफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक आॅफ रायपूर, स्टेट बँक आॅफ त्रावणकोर आणि स्टेट बँक आॅफ हैदराबाद या सहयोगी बँकांचे एसबीआयमध्ये विलीनीकरण झालेले आहे. या बँकांच्या ग्राहकांना त्यांचे चेकबुक आता बदलून घ्यावे लागेल.एसबीआयने जारी केलेल्या निवेदनानुसार, ग्राहक नवीन चेकबुक बँक शाखेत जाऊन प्राप्त करू शकतात. एटीएम अथवा एसबीआय मोबाइल अ‍ॅपचा वापर करूनही ग्राहकांना नवीन चेकबुक घेता येईल. एसबीआयच्या अधिका-यांनी या आधी जुने कोड असलेले चेकबुक चालतील, असे म्हटले होते. जुन्या कोडला नव्या कोडशी अंतर्गत मॅप करण्यात आले आहे, असे अधिका-यांनी सांगितले.>सर्व शाखांमध्ये करण्यात आले बदलविलीनीकरणानंतर एसबीआयने विलीन झालेल्या बँक शाखांची नावे, शाखा कोड आणि आयएफएससी कोड बदलले आहेत. मुंबई, नवी दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकता, पाटणा, अहमदाबाद, भोपाळ, अमरावती, चंदीगड, जयपूर, थिरुवनंतपुरम आणि लखनौ या शहरांसह सर्व ठिकाणच्या शाखांत हे बदल करण्यात आले आहेत. आयएफएससी कोड हे ‘इंडियन फायनान्स सीस्टिम कोड’चे लघुरूप आहे.हा ११ अंकी (अल्फा-न्युमरिक कोड) क्रमांक आहे. वाहनांच्या क्रमांकाप्रमाणे तो एकमेवाद्वितीय असतो. म्हणजेच प्रत्येक बँक शाखेला स्वतंत्र क्रमांक असतो. हा कोड म्हणजे संबंधित शाखेची डिजिटल ओळखच आहे. रिझर्व्ह बँकेच्या निधी हस्तांतरण व्यवस्थेत या कोडचा वापर होतो. या कोडशिवाय बँकांमधील आर्थिक व्यवहारच होऊ शकत नाही.

टॅग्स :एसबीआय