Join us  

केंद्र सरकारने साखरेऐवजी इथेनॉल निर्मितीला अधिक प्रोत्साहन द्यावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 1:47 AM

उसापासून फक्त साखर तयार करण्याऐवजी केंद्र सरकारने बी-हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्यास पुढाकार घ्यावा.

- विश्वास खोड नवी दिल्ली : उसापासून फक्त साखर तयार करण्याऐवजी केंद्र सरकारने बी-हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्यास पुढाकार घ्यावा. पर्यायी इंधनाच्या निर्मिती प्रक्रियेलाही त्यामुळे गती येईल, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीति आयोगाच्या बैठकीत रविवारी केले.महाराष्ट्राच्या विविध योजनांचा उल्लेख करीत मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात ३,५00 ग्रामीण हाट आहेत, त्यांचे नूतनीकरण व सुधारणांसाठी अ‍ॅग्री मार्केट इन्फ्रा फंडमधून निधी मिळावा. या हाटद्वारे शेतमालाची विक्री व ग्रामपंचायतींचे उत्पन्नही वाढेल. दुधासाठी जीवनावश्यक वस्तू अधिनियमाखाली किमान हमीभाव निश्चित करण्यात यावा. विशेष कृषी ग्राम योजनेंतर्गत स्किम्ड दूध भुकटी (पावडर) निर्यातीवर १० टक्के प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे.साखरेचे किमान मूल्य निश्चित करण्यात यावे. त्याचबरोबर, साखर कारखान्यांच्या सॉप्ट लोनची फेररचना करून, कर्ज परतफेडीचा कालावधी आणखी दोन वर्षांनी वाढवावा, असे नमूद करीत मुख्यमंत्री म्हणाले, साखरेचे निर्यात मूल्य, तसेच केंद्रातर्फे प्रतिटन ५५ रुपये अनुदानाची रक्कम प्राप्त होईपर्यंत, मार्जिन मनीसाठी बँका व वित्तीय संस्थांनी कारखान्यांकडे आग्रह करू नये, असे निर्देश रिझर्व्ह बँक आणि नाबार्डतर्फे देण्यात यावेत. अशी मागणीही फडणवीस यांनी केली.>संरक्षण मंत्रालयाच्या गार्डन रिच बिल्डर्स अँड इंजिनिअर्स सोबत गडचिरोली सारख्या दुर्गम भागात पूल उभारण्याचा करार करण्याची परवानगी राज्याला द्यावी, असेही फडणवीसांनी सांगितले.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसनिती आयोग