Join us

केंद्राने रोखला पेट्रोल-डिझेलच्या स्वस्ताईचा मार्ग

By admin | Updated: December 3, 2014 00:23 IST

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमती कमी झालेल्या असतानाच केंद्र सरकारने आज पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमती कमी झालेल्या असतानाच केंद्र सरकारने आज पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे २.२५ रुपये आणि १ रुपया प्रतिलीटर वाढ केली आहे. करवाढीमुळे पेट्रोल-डिझेलचे भाव मात्र वाढणार नाहीत. कंपन्या करवाढीचा बोजा सहन करणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त झाल्यामुळे भारतातही पेट्रोल-डिझेलच्या किमती उतारायला हव्या होत्या. तथापि, करात वाढ केल्यामुळे ते आता शक्य होणार नाही. करवाढ करून सरकारने पेट्रोल-डिझेलच्या स्वस्ताईचा मार्ग रोखला आहे. नवी करवाढ मंगळवारी मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात तीन आठवड्यांत सरकारने केलेली ही दुसरी दरवाढ आहे. १२ नोव्हेंबर रोजी पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात सरकारने लीटरमागे १.५0 रुपये वाढ केली होती. कच्चा तेलाच्या किमती दिवसेंदिवस स्वस्त होत असल्यामुळे निर्माण होणाऱ्या अतिरिक्त नफा केंद्र सरकार कराच्या रुपयाने ओढून घेत आहे. सोमवारी पेट्रोलच्या दरात नाममात्र ९१ पैसे आणि डिझेलच्या दरात ८४ पैशांची कपात करण्यात आली होती. करवाढ केली नसती, तर पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त झाले असते. मंगळवारी करण्यात आलेल्या उत्पादन शुल्काच्या वाढीतून केंद्र सरकारच्या खजिन्यात वर्षाला ४ हजार कोटींचा अतिरिक्त महसूल जमा होईल. या आधीच्या शुल्कवाढीतून ६ हजार कोटींचा अतिरिक्त महसूल सरकारला मिळणार आहे. अश प्रकारे तब्बल १0 हजार कोटींचा महसूल सरकारला या करवाढींमधून मिळणार आहे. पेट्रोल-डिझेलवर लावण्यात आलेल्या अतिरिक्त शुल्कामुळे सरकारला अधिकचा महसूल उपलब्ध झाल्याने अप्रत्यक्ष करांचे लक्ष्य गाठण्यात मदत होईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)