नवी दिल्ली : जागतिक बाजारातील मजबूत संकेतांच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात व्यापाऱ्यांनी सणासुदीची खरेदी केल्याने तेजी परतली. सोन्याचा भाव ५५ रुपयांच्या सुधारणेसह २८,२३० रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला. औद्योगिक संस्थांच्या मागणीने चांदीचा भावही दीडशे रुपयांनी वधारून ४२,८५० रुपये प्रतिकिलो राहिला.बाजार जाणकारांनी सांगितले की, व्यापाऱ्यांनी ग्राहकांची सणासुदीची मागणी पूर्ण करण्यासाठी जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीची खरेदी केली. युक्रेन तणावात वाढ झाल्याने जागतिक बाजारात तेजी परतली.सिंगापूर बाजारात सोन्याचा भाव ०.५ टक्क्यांनी वधारून १,२८९.०५ डॉलर प्रतिऔंस आणि चांदीचा भावही ०.९ टक्क्यांनी वाढून १९.६३ डॉलर प्रतिऔंस राहिला.दिल्ली बाजारातच ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ५५ रुपयांनी वधारून अनुक्रमे २८,२३० रुपये आणि २८,०३० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा भाव दीडशे रुपयांनी उंचावून ४२,८५० रुपये आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भावही १२० रुपयांनी वाढून ४२,१७० रुपये प्रतिकिलोवर आला. यात गेल्या सत्रात ३०० रुपयांची घट नोंदली गेली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
खरेदीच्या मा-याने सोने-चांदी तेजीत
By admin | Updated: August 29, 2014 02:04 IST