Join us  

व्यापारयुद्धाचे पडसाद; निफ्टी १० हजारांच्या खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:37 AM

अमेरिका आणि चीन या जगातील दोन अव्वल अर्थव्यवस्थांमधील व्यापार युद्ध आणखी तीव्र होण्याच्या भीतीने जगभरातील शेअर बाजारांमध्ये झालेल्या घसरणीचा फटका भारतीय बाजारालाही बसला.

- प्रसाद गो. जोशीअमेरिका आणि चीन या जगातील दोन अव्वल अर्थव्यवस्थांमधील व्यापार युद्ध आणखी तीव्र होण्याच्या भीतीने जगभरातील शेअर बाजारांमध्ये झालेल्या घसरणीचा फटका भारतीय बाजारालाही बसला. मात्र, परकीय वित्तसंस्थांनी खरेदीचा हात दिल्याने हा झटका काहीसा सौम्य झाला. राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ९ आॅक्टोबरनंतर प्रथमच दहा हजार अंशांच्या खाली आल्यामुळे बाजारातील निराशा वाढली आहे.शेअर बाजारावर गेल्या महिनाभरापासून अस्वलाची मजबूत पकड असलली दिसून येत आहे. काही प्रमाणात वर जाणारा बाजार लगेचच खाली येतो. मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहाचा प्रारंभ वाढीव पातळीवर झाला. त्यानंतर, बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३३३५४.९३ ते ३२४८३.८४ अंशांदरम्यान हेलकावत राहिला. सप्ताहाच्या अखेरीस तो ३२५९६.५४ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहातील बंद निर्देशांकाच्या तुलनेत, त्यामध्ये ५७९.४६ अंश म्हणजेच १.२४ टक्के घट झाली.राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ९ आॅक्टोबरनंतर प्रथमच १० हजार अंशांच्या खाली बंद झाला आहे. सप्ताहामध्ये या निर्देशांकात १९७.१० अंशांची घट होऊन तो ९९९८.०५ अंशांवर बंद झाला. या निर्देशांकामध्ये सप्ताहात १.१५ टक्के एवढी घट झाली.राजकीय अस्थिरता आणि विविध बॅँकांमधील उघडकीस येणारे घोटाळे यामुळे भारतीय शेअर बाजारामध्ये मंदीचे वातावरण आहे. त्यातच जागतिक बाजारांमधील तेजी-मंदीचे चक्रही येथे प्रभाव पाडत असते. याशिवाय आंतरराष्टÑीय बाजारामधील खनिज तेलाचे दर आणि भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती, रुपयाचे मूल्य आदी बाबीही बाजारावर बरा-वाईट प्रभाव टाकत असतात. मात्र, सप्ताहात परकीय वित्तसंस्थांनी केलेल्या खरेदीमुळे बाजार फारसा पडला नाही, हे विशेष. अमेरिका आणि चीन यांच्या दरम्यानचे व्यापार युद्ध तीव्रहोण्याची चिन्हे असून, त्याचा फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसून वाढीचा वेग मंदावण्याची भीती व्यक्त होत असल्याने जागतिक बाजारखाली गेले.एमसीएक्सवर सोन्याच्या फ्युचरमधील व्यवहारांमध्ये ३.३ टक्के अशी साप्ताहिक वाढ झाली असून, गेल्या दोन वर्षांमधील ही सर्वाधिक साप्ताहिक वाढ आहे. जागतिक व्यापार युद्धाची व्याप्ती वाढण्याची शक्यता, शेअर बाजारांमध्ये असलेली मंदी आणि सोन्याची वाढलेली मागणी, यामुळे सोने तेजीमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.सोने फ्युचरच्या जून डिलीव्हरीचे दर १.७ टक्क्यांनी वाढून १३५५.७० डॉलर्स प्रति औंस असे बंद झाले आहेत. सोन्यामध्ये साप्ताहिक ३.३ टक्के अशी वाढ झाली आहे. एप्रिल २०१६ नंतरची ही सर्वाधिक साप्ताहिक वाढ आहे.आंतरराष्टÑीय व्यापार युद्धाची वाढलेली शक्यता, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने वर्षामध्ये केवळ तीन वेळा व्याजदर वाढविण्याची केलेली घोषणा आणि सोन्याची वाढती मागणी, यामुळे हा मौल्यवान धातू तेजीत आहे.

टॅग्स :निर्देशांक