Join us  

फोक्सवॅगनला ग्राहकांचाही दणका

By admin | Published: October 06, 2015 4:30 AM

आपल्या वाहनात सदोष इंजिन बसवून प्रदूषणाची मात्रा वाढवत सर्वसामान्य लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या फोक्सवॅगन कंपनीला आता ग्राहकांकडूनही दणका बसण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबई : आपल्या वाहनात सदोष इंजिन बसवून प्रदूषणाची मात्रा वाढवत सर्वसामान्य लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या फोक्सवॅगन कंपनीला आता ग्राहकांकडूनही दणका बसण्यास सुरुवात झाली आहे. उत्सर्जन आणि प्रदूषणाबाबतचा कंपनीचा जीवघेणा बनाव उघडकीस आल्यानंतर आता सप्टेंबर महिन्यात देशात कंपनीच्या वाहनांच्या विक्रीत लक्षणीय घट झाल्याचे वृत्त आहे.उपलब्ध माहितीनुसार १८ सप्टेंबर रोजी कंपनीने केलेल्या बनावाची माहिती उघडकीस आल्यानंतर याचे पडसाद भारतातही उमटले. कंपनीने ‘ईए-१८९’ हे इंजिन आपल्या विविध मॉडेल्समध्ये बसविले असून केवळ अमेरिकाच नव्हे तर भारतासह अनेक देशांतून या इंजिनचा समावेश असलेल्या कंपनीच्या गाड्या आहेत. ‘ईए-१८९’ ही इंजिन प्रामुख्याने गोल्फ, पसाट, जेट्टा, बीटल तसेच आॅडीच्या काही मॉडेल्समध्ये आहे. ही सर्व मॉडेल्स भारतात उपलब्ध असून उपलब्ध माहितीनुसार, पोलो, जेट्टा, व्हेन्टो या गाड्यांची विक्री मंदावली आहे. सर्वसाधारणपणे, सप्टेंबर हा महिना वाहन खरेदीचा महिना म्हणून ओळखला जातो. कारण, गणपतीपासून सणासुदीच्या काळाला सुरुवात होत असल्यामुळे या काळात खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. परंतु, आता सणासुदीचा काळ सुरू होऊनही ग्राहकांनी कंपनीच्या गाड्यांकडे पाठ फिरवत दणका दिल्याचे चित्र आहे. गेल्या सात महिन्यांत अर्थकारणात आलेल्या सुधारानंतर कंपनीच्या कामगिरीतही वाढ नोंदली गेली होती. मात्र, १८ सप्टेंबर रोजी अमेरिकी सरकारच्या पर्यावरण विषयक समितीने कंपनीने सॉफ्टवेअरद्वारे प्रदूषण लपविण्याचा केलेला बनाव उघड केल्यानंतर आणि त्यानंतर कंपनीने अमेरिकेतील पाच लाख वाहने माघारी बोलावल्यानंतर जगभरातून कंपनीच्या विरोधात आता हवा तापली आहे. सामान्य मर्यादेच्या ४० पट प्रदूषण करणाऱ्या वाहनांच्या निर्मितीमुळे कंपनीने केवळ ग्राहकांचीच फसवणूक केली नाही सर्वसामान्यांच्या जीवाशी देखील खेळ केल्याची भावना जनमानसात घट्ट रुतल्यामुळे आता ग्राहकांना दणका देण्यास सुरुवात केल्याचे विश्लेषण होत आहे. (प्रतिनिधी)