Join us

बीएसएनएलची पुन्हा नफ्याशी ‘जोडणी’

By admin | Updated: February 29, 2016 02:57 IST

आज घरोघरी मोबाईल, लँडलाईन आणि ब्रॉडबँड इंटरनेट आले आहे. अर्थात कितीही सेवा सुविधा देणाऱ्या खाजगी कंपन्या आजच्या घडीला त्यांच्या आकर्षक

आज घरोघरी मोबाईल, लँडलाईन आणि ब्रॉडबँड इंटरनेट आले आहे. अर्थात कितीही सेवा सुविधा देणाऱ्या खाजगी कंपन्या आजच्या घडीला त्यांच्या आकर्षक पॅकेजसह सज्ज असल्या तरी आजही खात्रीशीर सेवेसाठी बीएसएनएल अर्थात भारत संचार निगम लि.चे ग्राहकांच्या मनातील स्थान कायम आहे. एक कंपनी म्हणून मधल्या काही वर्षांत बीएसएनएल दूरसंचार कंपन्यांच्या स्पर्धेत मागे पडल्याचे दिसले होते. पण आता बीएसएनएल पुन्हा एकदा कायाकल्पासाठी तर सज्ज झाली आहेच, पण अद्ययावत आणि सर्वोत्तम तंत्रज्ञानाची उपलब्धी करून देण्याच्या स्पर्धेतही पूर्ण ताकतीने उतरली आहे. दूरसंचाराखेरीज अन्य क्षेत्रातील विस्तारही कंपनीने वाढविल्यामुळे केवळ दूरसंचार सेवा देणारी एक कंपनी म्हणून बीएसएनएलकडे बघणे खुजेपणाचे ठरेल. तर दूरसंचार आणि देशाच्या डिजिटलायझेशनच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा दुवा म्हणून कंपनी कार्यरत आहे. कंपनीच्या या कायाकल्पासंदर्भात आमचे प्रतिनिधी मनोज गडनीस यांनी बीएसएनएलच्या महाराष्ट्र सर्कलचे महाप्रबंधक जी. के. उपाध्याय यांच्याशी केलेली ही बातचीत...=गेल्या काही वर्षांच्या चढ-उतारानंतर २०१८ पर्यंत बीएसएनएल पुन्हा नफा नोंदवेल अशी माहिती आपल्या अध्यक्षांनी अलीकडेच दिली होती. कशा पद्धतीने काम सुरू आहे ?जोमाने काम सुरू आहे. निव्वळ नफा नोंदविण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहेच. पण आवर्जून सांगावेसे वाटते की, गेल्या आर्थिक वर्षापासूनच आम्ही आॅपरेशन नफा नोंदविण्यास सुरुवात केली आहे. आॅपरेशन नफा याचा साधा अर्थ म्हणजे आमच्या खर्चापेक्षा जास्त असे आमचे उत्पन्न आहे. विविध प्रकारच्या सेवांचा विस्तार आणि नव्या आकर्षक योजना यांच्यामुळे आमचा नफा वाढण्यास मदत झाली. बीएसएनएलला मिळणाऱ्या एकूण महसुलात महाराष्ट्राचा वाटा हा १० टक्के आहे. एकूणच आमच्या उत्पन्नात वाढ नोंदली जात आहे, ही सकारात्मक बाब आहे आणि हा वेग निश्चितच कायम राहिल, असा मला विश्वास आहे. =अनेक खाजगी कंपन्यांकडून सध्या ४-जीसाठी स्पर्धा सुरू आहे. बीएसएनएलची याबाबत काय योजना आहे ?लवकरच आम्हीही ४-जीची सेवा घेऊन येत आहोत. पण या निमित्ताने मला आवर्जून सांगायचे आहे की, सुमारे १७४ ठिकाणी आम्ही वाय-फाय हॉटस्पॉट सेवा देण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे. याचे वैशिष्ट् म्हणजे तांत्रिक पातळीवर विचार केला तर ४-जीपेक्षाही वेगवान किंबहुना, ४.५ जी (फोर पॉइंट फाय) म्हणता येईल, असा या सेवेचा वेग आहे. =ब्रॉडबँड इंटरनेटच्या सेवेत बीएसएनएलचा मोठा बोलबाला आहे, काय सांगाल ?ब्रॉडबँड इंटरनेट सेवेसाठी आम्हाला मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची पसंत मिळत आहे. ब्रॉडबँड इंटरनेटच्या व्यवसायात ८ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. या सेवेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना आम्ही किमान ‘२ एमबीपीएस’ अशी वेगवान इंटरनेट सेवा देत आहोत. इंटरनेटच्या जगात आमची सेवा लोकप्रिय आहे पण विशेष म्हणजे याकरिता अजिबात वेटिंग लिस्ट नाही. त्यामुळे ग्राहकाने अर्ज केल्यावर तातडीने त्याची जोडणी करण्यात येते. =कॉल ड्रॉपच्या मुद्यावर दूरसंचार नियामक प्राधीकरणाने १ रुपयाच्या भरपाईची सुतोवाच केले आहे, आपले काय मत आहे आणि आपली व्यवस्था कशी आहे ?दूरसंचार प्राधीकरण ही मोठी संस्था आणि नियामक प्राधीकरण आहे. त्यांनी दिलेले निर्देश पाळणे आमचे कर्तव्य आहे. पण कॉल ड्रॉपच्या मुद्यावर मला आवर्जून सांगावेसे वाटते की, आमचे सेवेवरील कॉल ड्रॉपचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी आहे. =मोबाईल टॉवरच्या मुद्यावरून अनेक चर्चा होत असतात, आपला काय अनुभव आहे ?मोबाईल टॉवरवरून अनेक चर्चा होतात, हे खरे आहे. अनेक ठिकाणी मोबाईल टॉवर उभे करणे हे निश्चित आव्हानात्मक काम आहे. विशेषत: गोव्यात आम्ही हा अनुभव घेतला. लोकांना मोबाईलची सेवा उत्तम हवी असते पण टॉवर नको असतो, असे चित्र आहे. त्यामुळे आता हळूहळू ‘टॉवर शेअरिंग’चा प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. =केंद्र सरकारने ‘डिजिटल इंडिया’ची घोषणा केली आहे, यामध्ये आपले योगदान कसे असेल ?‘डिजिटल इंडिया’ या मिशनमध्ये सरकारतर्फे जी जवाबदारी आमच्यावर सोपविली जाईल ती पूर्णपणे आमच्याकडून पार पाडली जाईल. केंद्र सरकारच्या पातळीवर आणि राज्य सरकारसोबत आम्ही निश्चित या मिशनवर कार्यरत आहोत. महत्वाचे म्हणजे, देशात नॅशनल आॅप्टिकल फायबरचे जाळे विणण्याचे काम सुरू असून जवळपास देशाच्या ७० टक्के भूभागावर तर महाराष्ट्रात १०० टक्के भूभागावर हे जाळे विणण्याचे काम बीएसएनएल करणार आहे. दूरसंचार सेवेसोबतच महाराष्ट्रात आम्ही राज्य सरकारसोबत काही प्रकल्पांवर काम केले आहे व करत आहोत. पुणे शहरात सीसीटीव्ही लावणे व जोडणी करण्याचे काम बीएसएनएलला देण्यात आले आहे. आणि ते अत्यंत जवाबदारीने पार पाडले आहे. याचसोबत आता नागपूर, नाशिक आदी शहरांमध्ये अशाच प्रकारच्या सीसीटीव्ही प्रकल्पांसाठी आमची बोलणी सुरू आहेत.सध्या कंपनीतर्फे कोणत्या आकर्षक योजना सुरू आहेत ?अलीकडच्या काळात आम्ही सुरू केलेल्या तीन योजनांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. या तीन योजना पुढीलप्रमाणे.आम्ही देशपातळीवर रोमिंग सेवा मोफत केली आहे. याचा साधा अर्थ असा की, आमच्या नेटवर्कवरील ग्राहक देशाच्या कोणत्याही भागात गेला तरी रोमिंगचे शुल्क लागत नाही. लँडलाईन सेवेवरून आम्ही रात्री ९ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कॉलिंग सेवा ग्राहकांना पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये लँडलाईन ते लँडलाईन आणि लँडलाईन ते मोबाईल अशा कोणत्याही सेवेवर त्यांना शुल्क लागणार नाही.इंटरनेट सेवा. किमान २ एमबीपीएस इतकी वेगवान सेवा आम्ही ग्राहकांना देतो. त्यामुळे आमच्या इंटरनेट सेवेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद आहे.