Join us

कातळेवाडीत बाटली उभीच

By admin | Updated: September 13, 2014 22:59 IST

दारूबंदीसाठी मतदान : २०८ पैकी केवळ १०० महिलांचे झाले मतदान

दारूबंदीसाठी मतदान : २०८ पैकी केवळ १०० महिलांचे झाले मतदान
मलकापूर : कातळेवाडी (ता. शाहूवाडी) येथे दारूबंदीसाठी एकूण मतदानापैकी ४८.०७ टक्के मतदान एवढ्याच महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आडव्या बाटलीसाठी ३५.५७ टक्के महिलांनी मतदान केले. कातळेवाडी गावात बाटली उभी राहिली. मतदान शांततेत पार पडले. शाहूवाडी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
कातळेवाडी गावात गेल्या अनेक वर्षांपासून गावठी दारू, बिअर शॉपी, मटका, दारू, आदी अवैध धंदे जोरात सुरू आहेत. याचा महिला वर्गाला मोठा त्रास होत होता. ७ एप्रिलच्या ग्रामसभेत महिलांनी दारूबंदीचा ठराव मांडला. ठराव मंजूर होऊन जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.
दारूबंदीसाठी सकाळी सात वाजता मतदानास प्रारंभ झाला. सकाळी ११ वाजता ४० महिलांनी मतदान केले. दुपारी दोन वाजेपर्यंत शंभर महिलांनी मतदान केले. २०८ महिला मतदारांपैकी १०० महिलांनी मतदान केले. आडव्या बाटलीसाठी ७४, तर उभ्या बाटलीसाठी १० मतदान झाले. १६ मते बाद झाली. त्यामुळे आडव्या बाटलीसाठी ३५.५७ टक्के एवढे कमी मतदान झाले. त्यामुळे बाटली उभीच राहिली. आडव्या बाटलीसाठी ३५ मतदानाची आवश्यकता होती. गावातील गटातटाच्या राजकारणामुळे येथील महिलावर्गावर पुरुषांचा दबाव असल्याचे जाणवत होते.
शाहूवाडी पोलीस ठाण्याचे फौजदार एम. एस. नाळे व राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाचे पोलीस निरीक्षक आर. एल. खोत यांनी मोठा बंदोबसत तैनात केला होता. गावात सकाळपासून तणावपूर्ण वातावरण होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बाजीराव पाटील यांनी काम पाहिले.
------------
चौकट :
शाहूवाडी तालुक्यात बिअर शॉपींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून गावागावात बिअर शॉपी आहेत. यामध्ये बिअरऐवजी देशी-विदेशी दारू विकली जाते.
----------
कातळेवाडी गावात ३५ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असता तर एकूण मतदान १०९ झाले असते. बाटली आडवी झाली असती, याची चर्चा महिलावर्गात सुरू होती.
-----------
फोटो ओळ : कातळेवाडी (ता. शाहूवाडी) येथील गावात दारूबंदीसाठी महिलांनी मतदानासाठी मतदान केंद्रावर केलेली गर्दी. (छाया : राजाराम कांबळे)