Join us  

काळा पैसा : नावे जाहीर करू नका!

By admin | Published: October 27, 2014 1:35 AM

विदेशात काळा पैसा ठेवणाऱ्यांची नावे जाहीर करण्यास असोचेमने विरोध केला आहे. या लोकांची नावे अपरिपक्व पद्धतीने जाहीर केल्यास काळ्या पैशाविरोधातील लढाईवर प्रतिकूल परिणाम होईल

नवी दिल्ली : विदेशात काळा पैसा ठेवणाऱ्यांची नावे जाहीर करण्यास असोचेमने विरोध केला आहे. या लोकांची नावे अपरिपक्व पद्धतीने जाहीर केल्यास काळ्या पैशाविरोधातील लढाईवर प्रतिकूल परिणाम होईल, असे असोचेमने म्हटले आहे.एका निवेदनात असोचेमने म्हटले की, भारतीय नागरिक आणि कंपन्यांसाठी दुहेरी करबचाव करार महत्त्वाचे आहेत. कारण या करारांमुळे दुहेरी करांपासून ते वाचू शकतात. स्वीस बँकेत पैसा ठेवणाऱ्यांची नावे जाहीर केल्यास या कराराचे उल्लंघन होईल. स्वीस बँकेत पैसा असणाऱ्यांची नावे जाहीर झाल्यास ब्रेकिंग न्यूज बनतील, चर्चा होईल; पण त्यातून काहीच साध्य होणार नाही. उलट काळ्या पैशांच्या विरोधातील लढाई कमजोर होईल. दुहेरी कर बचाव करारांचे उल्लंघन झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. नावे जाहीर करण्यात अनेक धोके आहेत, असे स्पष्ट करून असोचेमने म्हटले की, स्वीस बँकेत काळा पैसा आहे म्हणून नावे जाहीर झाली आणि अंतिमत: हे लोक दोषी नाहीत, असे स्पष्ट झाले तरी संबंधित नागरिक आणि कंपन्या यांचे जे नुकसान झालेले असेल, ते भरून निघणार नाही. विदेशातील काळा पैसा हा भाजपाने गेल्या लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचा मुख्य मुद्दा बनविला होता. नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रत्येक सभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यास १00 दिवसांत विदेशातील काळा पैसा भारतात परत आणू, असे भाजपाने जाहीर केले होते. सरकार आल्यानंतर मात्र सरकारने या मुद्याबाबत भूमिका बदलली आहे. विदेशात काळा पैसा असलेल्या नागरिकांची नावे जाहीर करण्यास भाजपा सरकारने आता नकार दिला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यासंबंधी म्हटले आहे की, अनेक देशांसोबत केलेल्या गोपनीयता विषयक करारांचा अडथळा असल्यामुळे ही नावे जाहीर करता येणार नाहीत. जेटली यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने जोरदार टीका केली होती. त्यामुळे बचावात्मक पवित्र्यात आलेल्या जेटली यांनी यासंबंधी न्यायालयात खटले दाखल झाल्यानंतरच संबंधितांची नावे जाहीर करता येतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)