Join us  

३९६ कोटींचा काळा पैसा उघड, सजग नागरिकांनी कळविली होती माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 3:05 AM

सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यानंतर नोटा बदलीत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी दाखल झालेल्या ८४ गुन्ह्यांत सीबीआयने ३९६ कोटी रुपयांचा काळा पैसा उघडकीस आणला.

नवी दिल्ली : सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यानंतर नोटा बदलीत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी दाखल झालेल्या ८४ गुन्ह्यांत सीबीआयने ३९६ कोटी रुपयांचा काळा पैसा उघडकीस आणला. सीबीआयच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली.गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी सरकारने नोटाबंदी जाहीर केली होती. त्यानंतर जुन्या नोटा बँकांत जमा करून नव्या नोटा लोकांना देण्यात आल्या होत्या. या व्यवहारात काळा पैसा पांढरा करण्याचे प्रकार होत होते. याअनुषंगाने सीबीआयकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.त्यातील ८४ गुन्हे सीबीआयने तपासले. सात गुन्ह्यांत बेकायदेशीर नोटा बदली झाल्याचे उघड झालेहोते. या व्यवहारांत व्यावसायिक बँका, सहकारी बँका, पोस्टकार्यालये, रेल्वे आणि विमा कंपन्यांचा सहभाग असल्याचे चौकशीत समोर आले होते.विविध वित्तीय संस्थांत होत असलेल्या बेकायदेशीर नोटा बदलीच्या व्यवहारांच्या ९२ तक्रारी सीबीआयकडे आल्या होत्या. विशेष म्हणजे सामान्य लोकांकडून या तक्रारी सीबीआयला प्राप्त झाल्या होत्या. त्यांची सीबीआयने दखल घेतली.सीबीआयचे प्रवक्ते अभिषेक दयाल यांनी सांगितले की, काही लोकांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून नव्या नोटांच्या स्वरूपातील मोठ्या रकमा जप्त करण्यात आल्या होत्या. या काळात बँकांतून पैसे काढण्यावर ठरावीक मर्यादा घालण्यात आलेल्या होत्या, तरीही या लोकांना मोठमोठ्या रकमा कशा आणि कुठून मिळाल्या, याचा तपास सीबीआयने केला.सूत्रांनी सांगितले की, कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा दडवून ठेवलेल्या लोकांनी नोटाबंदीच्या काळात बँका आणि वित्तीय संस्थांना हाताशी धरून काळा पैसा पांढरा करून घेण्याचा प्रयत्न केला. काही सजग नागरिकांनी त्यांच्या निदर्शनास आलेल्या घटनांची माहिती सीबीआयला कळविली.

टॅग्स :नोटाबंदी