Join us  

भिवंडीतून देशभर होते चिनी वस्तूंचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 1:44 AM

जोवर स्वदेशी व्यवस्था उभारली जात नाही, तोवर ही व्यवस्था मोडून काढणे कोणालाही शक्य नाही.

नितीन पंडित भिवंडी : एकेकाळी कापड उद्योगाचे केंद्र म्हणून नावारूपाला आलेले भिवंडी सध्या गुदामांच्या अवाढव्य जाळ्यामुळे जगाच्या नकाशावर आहे. नवी मुंबईत जवाहरलाल नेहरू बंदरालगत गुदामे येण्याआधीच भिवंडीचा ग्रामीण भाग गुदामांनी व्यापला. येथून देशभर चिनी मालाचे वितरण होते. त्यातून उदयाला आलेल्या अर्थव्यवस्थेत हजारो कोटींची उलाढाल होते. त्यामुळे जोवर स्वदेशी व्यवस्था उभारली जात नाही, तोवर ही व्यवस्था मोडून काढणे कोणालाही शक्य नाही.भिवंडीजवळील पूर्णा हे एकेकाळी मालाच्या साठवणुकीचे केंद्र होते. पुढे मुंबईत गुदामांचे चौरस फुटांचे भाडे ७० ते ८० प्रतिचौरस फुटांवर गेले, तेव्हा भिवंडीत ९ ते ११ रुपयांचा भाव असल्याने हा व्यवसाय वाढला. जवळ असलेली बंदरे, विमानतळ, रेल्वेमार्गाचा विकास, जवळच असलेले मुंबई - नाशिक, मुंबई - अहमदाबाद, मुंबई - पुणे व मुंबई - गोवा महामार्ग यामुळे गुदामांचा व्यवसाय फोफावला.शेती आतबट्ट्याची ठरू लागल्याने, ओसाड जमिनींचे प्रमाण वाढल्याने आणि वीटभट्टी व्यवसायाला काँक्रीटने शह दिल्याने अनेक शेतजमिनी अकृषिक झाल्या आणि स्वस्तातील गुदामांच्या अर्थव्यवस्थेने बाळसे धरले.>भारतीय कंपन्यांच्या नावे नोंदणीअनेकदा गुदामांत माल जरी चिनी असला तरी तो चीनमधून आलेला नसतो. काही माल बांगलादेश, नेपाळमार्गेही येतो. बऱ्याचदा कंपनी चिनी असली, तरी तिची गुंतवणूक भारतात असल्याने तो माल ‘मेड इन इंडिया’च्या शिक्क्यासह येतो. मालाचे वितरण मार्केटिंग करणारी कंपनी भारतीय असल्याने त्यांच्या नावावरून उत्पादनासंदर्भात काहीच बोध होत नाही.<कशाकशाची साठवणूक?चपला, केसाचे तेल, मसाज व व्यायामाचे साहित्य, स्लीपरच्या यंत्रापासून औषधे, त्यांच्या निर्मितीसाठी- पॅकिंगसाठी आवश्यक साहित्य चीनहून येते. घरातील वापराच्या प्लॅस्टिकच्या व फर्निचरच्या जवळपास सर्वच वस्तू व कपडे, खेळणी, पूजेचे साहित्य, देवदेवतांच्या मूर्तीही चीनमधून येतात. मोबाइल, लॅपटॉप, टॅब, अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वैद्यकीय उपकरणे, खाद्यपदार्थही येथे साठवले जातात. येथून ते गरजेनुसार देशभर वितरित केले जाते.