Join us

को-या कागदावर सही करताना सावधान!

By admin | Updated: September 10, 2014 03:32 IST

कर्जाची वसुली कर्जदाराकडून करायची की हमीदाराकडून हे ठरविण्याचा सर्वस्वी अधिकार कर्ज देणाऱ्या बँकेचा आहे

नवी दिल्ली : कर्जाची वसुली कर्जदाराकडून करायची की हमीदाराकडून हे ठरविण्याचा सर्वस्वी अधिकार कर्ज देणाऱ्या बँकेचा आहे. कर्जदाराकडून वसुली होऊ शकली नाही तरच हमीदाराकडून कर्जवसुली करा, असा आदेश कायद्याने बँकेला दिला जाऊ शकत नाही, असा तमाम हमीदारांनी सावध व्हावे असा निकाल राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला.तुम्ही एखाद्याला बँकेकडून कर्ज मिळवून देण्यास मदत केली. तसे करत असताना बँकेने तुमची एखादी कोऱ्या कागदावर सही घेतली आणि नंतर तुम्ही त्या कागदाचा हमीदाराचे तारणपत्र म्हणून उपयोग करून बँकेने फसवणूक केली, अशीही कितीही ओरड केली, तरी काही उपयोग होणार नाही. कारण न्यायालयात तुमचा हा दावा टिकणार नाही व प्रत्यक्षात हमीदार न राहिलेल्या कर्जाची परतफेडही तुमच्या माथी बसेल, हेही या निकालावरून स्पष्ट झाले आहे. कॅनरा बँकेने केलेले अपील मंजूर करताना राष्ट्रीय मंचाचे कार्यवाहक अध्यक्ष न्या. जे.एम. मलिक व सदस्य एस.एम. कांटीकर यांच्या न्यायपीठाने हा निकाल दिला. एका ग्राहकास दिलेल्या ‘ओव्हड्राफ्ट’च्या थकित रकमेची वसुली, त्याच्या मृत्यूनंतर, आर.एस. वासन यांच्याकडून हमीदार म्हणून करण्याच्या बँकेच्या कारवाईवर ग्राहक आयोगाने शिक्कामोर्तब केले. सी.के. प्रभाकरन या एका परिचितास वासन यांनी कॅनरा बँकेच्या त्रिचूर शाखेकडून जून ९६मध्ये १ लाख रुपयांच्या ‘ओव्हरड्राफ्ट’ची सवलत मिळवून दिली होती. प्रभाकरन यांच्या मृत्यूनंतर बँकेने हमीदार या नात्याने वासन यांच्या मुदत ठेवींमधून परस्पर रक्कम वळती करून घेऊन थकित कर्जाची वसुली केली होती. ही कृती बेकायदा ठरवून वासन यांना ती रक्कम व्याजासह परत करण्याचा आदेश प्रथम जिल्हा ग्राहक मंच व नंतर राज्य आयोगाने दिला म्हणून कॅनरा बँक राष्ट्रीय आयोगाकडे आली होती.