Join us  

सावधान! जीएसटीत अनोंदणीकृत व्यापाऱ्याकडून खरेदी घातक

By admin | Published: May 15, 2017 12:25 AM

कृष्णा, जीएसटीमधील विशिष्ट तरतुदीमध्ये आर. सी. एम. ची तरतूद येते. या तरतुदीनुसार दुसऱ्याचे कर भरण्याची संकल्पना काय आहे?

करनीती भाग १८१ - सी. ए. उमेश शर्माअर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, जीएसटीमधील विशिष्ट तरतुदीमध्ये आर. सी. एम. ची तरतूद येते. या तरतुदीनुसार दुसऱ्याचे कर भरण्याची संकल्पना काय आहे? कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, सर्व्हिस टॅक्स कायद्यातील रिव्हर्स चार्जची तरतूद जीएसटीमध्ये शासनाने आणली आहे. सर्व्हिस टॅक्समध्ये फक्त विशिष्ट व्यक्तींना व विशिष्ट सेवांकरिता रिव्हर्स चार्जची तरतूद आहे. परंतु जीएसटीमध्ये प्रत्येक करदात्याला वस्तू व सेवा या दोघांवर रिव्हर्स चार्जची तरतूद लागू केली आहे.अर्जुन : आर. सी. एम. म्हणजे?कृष्ण : अर्जुना, आर. सी. एम. म्हणजे ‘‘रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम’’ याचा अर्थ वस्तू किंवा सेवा पुरवणाऱ्याचा जीएसटी वस्तू किंवा सेवा स्वीकार करणाऱ्याने भरणे. सोप्या भाषेत दुसऱ्याचा कर स्वत: भरणे, आर. सी.एम.मध्ये कोण कोणते व्यवहार मोडतील हे नमूद केलेले आहेत.अर्जुन : कृष्णा, करदात्याने अनोंदणीकृत व्यापाऱ्याकडून वस्तू किंवा सेवा खरेदी केली तर काय?कृष्ण : अर्जुना, जीएर्सटीमध्ये जर अनोंदणीकृत व्यक्तींकडून वस्तू किंवा सेवा घेतल्या तर त्यावर नोंदणीकृत असलेल्या व्यक्तीला खरेदीवर जीएसटी भरावा लागेल. उदा. जर करदात्याने अनोंदणीकृत चहावाल्याकडून चहा घेतला व त्याचा खर्च पुस्तकात मांडला तर त्यावर आर. सी. एम्च्या तरतुदीनुसार जीएसटी भरावा लागेल. दैनंदिन व्यापारात प्रत्येक व्यापारी अनेक वस्तू किंवा सेवा अनोंदणीकृत व्यापाऱ्यांकडून खरेदी करतो. त्यांना या तरतुदीमुळे दुसऱ्याचा कर भरावा लागणार आहे. कम्पोझिशन डिलरला अनोंदणीकृत व्यापाऱ्याकडून वस्तू किंवा सेवा घेतली असेल तर त्यावर आर. सी. एम. अनुसार कर भरावा लागेल. तसेच जर ३० जून २०१७ ला स्टॉकमध्ये अनोंदणीकृत व्यापाऱ्याकडून खरेदी केलेल्या वस्तू असतील तर त्यावरही कर भरावा लागेल. तसेच प्रत्येक करदात्याला प्रत्येक महिन्याचे रिटर्न भरताना याची माहिती देऊन कर भरावा लागेल.अर्जुन : रिव्हर्स चार्जच्या तरतुदीनुसार वस्तू पुरवठ्याची वेळ कोणती?कृष्ण : अर्जुना, वस्तू पुरवठ्याची वेळ खालीलपैकी जी सर्वात आधी असेल ती१) वस्तू मिळाल्याची तारीख. किंवा २) ज्या तारखेला वस्तूचा मोबाईल दिला. किंवा ३) ज्या तारखेला विक्रेत्याने बिल दिले त्यानंतर ३० दिवस.उदा. करदात्याने अनोंदणीकृत व्यापाऱ्याकडून स्टेशनरी २५ जुलै २०१७ ला विकत घेतली त्याचे बिल २ आॅगस्टला मिळाले व त्याला मोबदला २८ आॅगस्टला दिला तर मग, आर. सी. एम् च्या तरतुदी अनुसार पुरवठ्याची वेळ (सर्वात आधीची तारीख) २५ जुलै धरली जाईल.अर्जुन : रिव्हर्स चार्जच्या तरतुदीनुसार सेवा पुरवठ्याची वेळ कोणती?कृष्ण : सेवा पुरवठ्याची वेळ खालील पैकी जी सर्वात आधी असेल ती१) ज्या तारखेला सेवेचा मोबदला दिला. किंवा २) ज्या तारखेला सेवा देणाऱ्याने बिल दिले त्यानंतर ६० दिवस. अर्जुन : कृष्णा, या आर. सी. एम्मध्ये जीएसटी भरल्याचे के्र डीट करदात्याला मिळते का?कृष्ण : अर्जुना, प्रत्येक करदात्याला जर आर. सी. एम् च्या तरतुदी अनुसार कर भरला असेल तर त्याला त्याचे क्रेडीट मिळते. परंतु त्याला आधी कर भरावा लागेल व पुढील महिन्यात त्याचे क्रेडीट मिळेल. उदा. करदात्याने जर आॅगस्ट महिन्यामध्ये आर. सी. एम् अनुसार कर भरला असेल तर त्याचे के्र डीट सप्टेंबर महिन्यात मिळेल. जीएसटी कायद्यानुसार खाद्यपदार्थ, इमारत, पॅसेजर्स वाहतुकीचा खर्च यावर जीएसटी भरल्याचे के्र डीट मिळत नाही. जर खाद्यपदार्थ, इमारत, पॅसेजर्स वाहतुकीचा खर्च यावर आर. सी. एम् तरतुदी अनुसार कर भरला असेल तर त्याचे क्रेडीट मिळणार नाही. याचा अर्थ व्यापाऱ्यांना अशा वस्तू वरील कराचे ओझे सहन करावे लागतील. उदा. अनोंदणीकृत व्यापाऱ्याकडून खाद्यपदार्थांची रु. २० हजारांची खरेदी केली असेल तर त्यावर आर. सी. एम् मध्ये रु. २४०० भरले असेल तर त्याला त्याचे क्रेडीट मिळणार नाही. म्हणजेच त्या व्यापाऱ्याचा २४०० रुपयांचा खर्च मांडला जाईल.