मुंबई : बँक आणि पायाभूत कंपन्यांच्या पाठबळामुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने बुधवारी ३२१ अंकांनी उसळी घेतली. गेल्या पंधरवड्यात एका दिवसात निर्देशांकाने घेतलेली ही लक्षणीय झेप होय. भारतीय रिझर्व्ह बँकेने पायाभूत क्षेत्रासाठी वित्तीय साह्यासंदर्भातील नियम काहीसे शिथिल केले असून, अर्थव्यवस्थेतही सुधारणा दिसून येत असल्याने शेअर बाजाराला पाठबळ मिळाले. मुंबई शेअर बाजाराची आजच्या सत्राची सुरुवात जोमदार झाली. दिवसअखेर ३२१ अंकांनी वधारत बीएसई-निर्देशांक आठवडाभरातील उच्चांक पातळी गाठत २५,५४९.७२ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकही ९७.७५ अंकांनी उसळी घेत दिवसअखेर ७,६२४.४० अंकांवर पोहोचला.पायाभूत क्षेत्राच्या विकासासाठी रिझर्व्ह बँकेने या क्षेत्रासाठी वित्तीय साह्यासंदर्भातील नियम शिथिल केले आहेत. तसेच दीर्घमुदतीच्या रोख्यांना सीआरआर व एसएलएल यासारख्या नियमातूनही सूट दिली आहे. उभारण्यात आलेल्या निधीचा उपयोग या क्षेत्राशी संबंधित प्रकल्पावर केला तर ही सूट मिळणार आहे.चीनची अर्थव्यवस्थेची स्थिती दुसऱ्या तिमाहीतही विस्तारल्याने धातू आणि खाण क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सच्या खरेदीवर गुंतवणूकदारांनी जोर दिला.जाणकारांचे असे म्हणणे आहे की, मान्सूनची स्थिती सुधारत असून जून महिन्यात निर्यात व्यापारात चांगली वाढ झाली आहे. शिवाय युरोपियन बाजारातील तेजीचे संकेत आणि जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव उतरल्याने भारतीय शेअर बाजाराला बळ मिळाले. (प्रतिनिधी)
बँक आणि इन्फ्रा सेक्टर्सचे शेअर बाजाराला मिळाले बळ
By admin | Updated: July 17, 2014 00:13 IST