मनोज गडनीस - मुंबईकेंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पाद्वारे प्रत्यक्ष प्राप्तिकराच्या रचनेत कोणताही बदल केला नसला तरी प्रवास भत्त्याची रक्कम दुप्पट करणे किंवा राष्ट्रीय पेन्शन योजनेत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींना ५० हजाराचे उत्पन्न करमुक्त करण्याची मुभा दिल्यामुळे आगामी आर्थिक वर्षात करदात्यांच्या करात सरकारी साडे चार हजार रुपयांपर्यंत बचत होणार आहे. मात्र, नव्या तरतुदींचा सर्वाधिक लाभ हा जे कर्मचारी सध्या प्राप्तिकराच्या ३० टक्के मर्यादेत येतात त्यांना होईल, असे दिसते.नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदींद्वारे करातील बचत नेमकी कशी साधली जाऊ शकेल, याबाबत चार्टर्ड अकाऊटंट अजित जोशी म्हणाले की नव्या सरकारने गेल्यावर्षी जुलै महिन्यात जो अर्थसंकल्प सादर केला होता, त्यामध्ये प्राप्तिकराच्या रचनेत बदल करत किमान मर्यादेत ५० हजार रुपयांची वाढ केली होती. हे करतानाच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड असेल, गृहकर्जावरील व्याजाच्या करमुक्ततेच्या मर्यादेत केलेली वाढ असेल किंवा राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र अथवा तत्सम गुंतवणुकीच्या साधनातील करमुक्त मर्यादेत वाढ केल्यामुळे चालू आर्थिक वर्षात कर्मचाऱ्याची सरासरी बचत ही साडे सहा हजार रुपये झाली आहे. त्यात सर्वाधिक लाभ हा जे प्राप्तिकराच्या १० टक्के मर्यादेत येतात त्यांना होईल. पण, यावेळी त्यांनी केवळ प्रवास भत्त्याची रक्कम (जी सध्या ८०० रुपये प्रतिमाह) आहे, ती दुप्पट करत १६०० रुपये प्रतिमाह इतकी केली आहे. याचा खरंतर सर्वाधिक फायदा जे कर्मचारी प्राप्तिकराच्या ३० टक्के मर्यादेत येतात, त्यांना होईल असे दिसत आहे. ३० टक्के श्रेणीतील लोकांच्या करमुक्त उत्पन्नातून २९६६ रुपयांची बचत होईल. तर २० टक्के श्रेणीतील लोकांच्या करमुक्त उत्पन्नात १९७८ तर १० टक्के श्रेणीतील लोकांच्या करमुक्त उत्पन्नात ९८९ रुपये इतकी वाढ होईल. ४दुसरा मुद्दा म्हणजे, राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांना प्राप्तिकर कायदा कलम ८०सीसीडी अंतर्गत ५० हजार रुपयांची अतिरिक्त सूट दिली आहे. मात्र, जर या योजनेत सहभागी झाले तरच ही सूट मिळेल. तसेच, एखाद्या कंपनीत नवीन कर्मचारी रुजू झाला तर त्याला प्रॉव्हिडंट फंड विभागाचे सदस्यत्व अथवा राष्ट्रीय पेन्शन योजना असे दोन पर्याय दिले जातील. ४या दोन्हीपैकी एका पर्यायाची त्याला निवड करावी लागले. पण, तरी जर कर बचतीसाठी आणि भविष्यवेधी गुंतवणुकीसाठी एखाद्या कर्मचाऱ्याने जर राष्ट्रीय पेन्शन योजनेचा स्वीकार केला आणि वरील प्रवास भत्त्याचा वापर विचार केला तर त्याच्या वार्षिक करमुक्त उत्पन्नात किमान साडेचार हजार रुपयांची बचत होईल.
आयकरात वाचणार सरासरी साडेचार हजार रुपये
By admin | Updated: March 3, 2015 23:53 IST