नवी दिल्ली : भारतीय अणुभट्ट्यांना युरेनियमचा पुरवठा करण्यासंबंधी करार विक्रमी वेळेत पूर्ण करीत भारत- कॅनडाने संबंधांचे नवे पर्व सुरू केले आहे. कॅनडाचे विदेशमंत्री जॉन बेअर्ड यांनी मंगळवारी विदेशमंत्री सुषमा स्वराज यांच्यासोबत व्यूहरचनात्मक वाटाघाटीची दुसरी फेरी पूर्ण करीत करारावर शिक्कामोर्तब केले. मात्र अणू सहकार्याचा नवा अध्याय सुरू करताना या दोन देशांना लांबचा पल्ला गाठावा लागला.दोन्ही देशांनी विक्रमी वेळेत अणुकरार प्रत्यक्षात आणत त्याकडे डोळे लावून बसलेल्यांना सुखद धक्का दिला आहे. अद्याप भारत- अमेरिका करार प्रत्यक्षात उतरलेला नाही. भारत- आॅस्ट्रेलियातील करार अस्तित्वात येण्यापूर्वीच सदर कराराची सर्व प्रक्रिया आटोपलेली असेल. अणू पुरवठा करणाऱ्या गटांमध्ये भारताला सदस्यत्व द्यावे यासाठी कॅनडाने पाठिंबा जाहीर केला आहे. अधिक क्षमतेच्या अणुभट्ट्या उभारण्यासाठी सहकार्याची दोन्ही देशांची योजना आहे. भारतातील अणुभट्ट्या कॅनडा मॉडेलवर आधारित असून सध्याची २०० मेगावॅटची क्षमता ७५० मेगावॅटपर्यंत वाढविण्यासाठी अत्याधुनिकीकरणाची योजना असल्याचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी सांगितले.
कॅनडासोबत विक्रमी वेळेत अणुकरार
By admin | Updated: October 16, 2014 08:46 IST