Join us

(निनाद) उभेवाडीत पुण्याचा कचरा पडूनच

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST


आश्वासन देऊनही अधिकारी फिरकले नाहीत
डिंभे : उभेवाडी येथील कचरा रविवारी उचलण्याचे आश्वासन पुणे महापालिकेच्या कचरा व्यवस्थापन विभागाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप यांनी दिल्यानंतरही उभेवाडी येथील कचरा उचलण्यात आला नाही. यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली असून हा कचरा उद्या न उचलल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
उभेवाडी(ता. आंबेगाव) येथे पुणे महापालिकेच्या जवळपास २५ गाड्यांनी कचरा टाकला. याविरोधात ग्रामस्थांनी प्रतिक्रिया दिल्या; तसेच हा कचरा न उचलल्यास आंदोलनाचाही इशारा दिला होता. आमदार दिलीप वळसे-पाटील यांनीही महापालिकेच्या अधिकार्‍यांना याबाबत विचारले होते. ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यामुळे पुणे महापालिकेचे कचरा व्यवस्थापन विभागाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप यांनी हा कचरा उचलण्याचे आश्वासन दिले होते. मात्र रविवारी हा कचरा उचलण्यासाठी कुठलेच अधिकारी वा कर्मचारी आले नाहीत. या कचर्‍यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. कचर्‍यात मोठ्या प्रमाणात असणार्‍या प्लॅस्टिकमुळे येथील पर्यावरणासह येथील वन्य व पाळीव प्राण्यांना अपायकारक ठरणार असल्याच्या प्रतिक्रिया आज दिवसभर या भागातील आदिवासी नागरिकांकडून देण्यात आल्या आहेत. दुर्गंधी पसरली असून यामुळे येथून जाणार्‍या-येणार्‍या आदिवासी नागरिकांना नाक दाबून जावे लागत आहे. उभेवाडीचा परिसर भीमाशंकर अभयारण्यापासून अतिशय जवळ आहे. या अभयारण्यात सांबर, हरीण, चितळ, ससे, रानडुक्कर, साळिंदर, कोल्हे, वानर आदी प्रकारचे वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आढळतात. सध्या उन्हाळ्याची तीव्रता हळूहळू वाढू लागली असून हे प्राणी चारा व पाण्याच्या शोधात जंगलाबाहेर पडू लागले आहेत. या प्राण्यांच्या पोटात या कचर्‍यातील प्लॅस्टिक गेल्यास मोठ्या प्रमाणात अपाय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा कचरा त्वरित न उचलल्यास नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सोबत फोटो, १५ फेबु्रवारी २०१५ डिंभे पी१,पी२
ओळी- उभेवाडी (ता. आंबेगाव) च्या हद्दीत पुणे महापालिकेने मोठ्या प्रमाणात टाकण्यात आलेल्या कचर्‍यामुळे या भागात दुर्गंधी पसरली असून आदिवासी नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
(छायाचित्र : कांताराम भवारी)
०००००