Join us  

६ कोटी ४५ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

By admin | Published: August 30, 2015 9:58 PM

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के जमीन वृक्षाच्छादित असणे आवश्यक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याचे शासनाचे नियोजन आहे.

सुहास सुपासे, यवतमाळपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के जमीन वृक्षाच्छादित असणे आवश्यक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याचे शासनाचे नियोजन आहे. त्या अनुषंगाने गेल्या काही वर्षांपासून राज्यात शतकोटी वृक्षलागवड योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत यावर्षी राज्यात २०१५ च्या पावसाळ्यात सहा कोटी ४५ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट महसूल व वनविभागाच्या वतीने ठरवून देण्यात आले आहे. आधीच यावर्षी पावसाच्या लहरीपणाचा फटका राज्याला बसला आहे. त्यातच आता पावसाळा संपायला केवळ एकच महिना शिल्लक आहे. अशावेळी शासनाने हे उद्दिष्ट दिले आहे. त्यामुळे उद्दिष्ट साध्य करताना सबंधित विभागांची चांगलीच दमछाक होणार आहे. या उद्दिष्टाचे वाटप प्रशासकीय विभागनिहाय, महसूल विभागनिहाय व जिल्हानिहाय वर्गीकृत करण्यात आले आहे. त्यानुसार अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांना सहा कोटी ४५ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट या पावसाळ्यात पूर्ण करावयाचे आहे. अमरावती जिल्ह्याला वने ०.८८, सामाजिक वनीकरण १.३१, कृषी ५.४९ असे एकूण ७.६८ लाख वृक्ष रोप लागवडीचे उद्दिष्ट आहे. अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्याला वने १.००, सामाजिक वनीकरण ०.३५, ग्रामविकास/जिल्हा परिषद १.८५, कृषी ३.४६ असे एकूण सहा लाख ३६ हजारांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्याला वने ५.७१, सामाजिक वनीकरण ४.८९, कृषी ६.३५ असे एकूण १६.९५ रोपे लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. अकोला जिल्ह्याला वने ५.०२, सामाजिक वनीकरण १.६७, ग्रामविकास/जिल्हा परिषद ०.८९, कृषी ०.६० असे एकूण ८.१८ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वाशीम जिल्ह्याला वने ३.५५, सामाजिक वनीकरण १.६७ व इतर ०.६० असे एकूण ५.८२ रोप लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. अशाच प्रकारे राज्यातील इतरही जिल्ह्यांना २०१५ च्या पावसाळ्यात रोपे लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांना एकूण ४४.९९ लाख रोपांचे उद्दिष्ट चालू पावसाळ्यासाठी देण्यात आले आहे. २०१२ च्या पावसाळ्यासाठी ३० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट अंतिमरीत्या निर्धारित करण्यात आले होते. २०१३ च्या पावसाळ्यासाठी १९.८६ कोटी वृक्ष लागवड आणि सन २०१४ च्या पावसाळ्यासाठी १६.१३ रोपे लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. आता २०१५ च्या पावसाळ्यासाठी ६.४५ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सर्व जिल्ह्यांसाठी निर्धारित केलेले उद्दिष्ट २०१५ च्या पावसाळ्यात पूर्ण केले जाईल, याची दक्षता घेण्याचेही निर्देश शासनाने दिले आहेत.