Join us  

एआयआयबी देणार ८,१४३ कोटी, मुंबई मेट्रो-४ च्या गुंतवणुकीचाही समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 3:35 AM

आशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेने (एआयआयबी) मुंबई मेट्रो-४ सह भारतातील पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये १२० कोटी

मुंबई : आशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेने (एआयआयबी) मुंबई मेट्रो-४ सह भारतातील पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये १२० कोटी डॉलर्स (८,१४३ कोटी रुपये) गुंतवणूक करण्याचे आश्वासन वार्षिक बैठकीच्या पार्श्वभूमीवर दिले आहे, पण त्याच वेळी भारतासाठीडोकेदुखी ठरणाऱ्या पाकिस्तान-चीन आर्थिक कॉरिडॉर किंवा पाकव्याप्त काश्मीरमधील प्रकल्पांच्या आर्थिक मदत देण्याची दुटप्पी भूमिकाही या बँकेने घेतली आहे.एआयआयबीची वार्षिक बैठक २६ जूनला मुंबईत होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचे उद्घाटन करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर बँकेचे उपाध्यक्ष डॅनी अ‍ॅलेक्झांडर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, भारतातील ऊर्जा प्रकल्प व आधुनिक वाहतूक प्रकल्पासह अन्य प्रकल्पांना ४५० कोटी डॉलर्स अर्थसाहाय्य देण्याची योजना बँकेने आखली आहे. यापैकी १२० कोटी डॉलर्स तत्काळ दिले जातील. त्याखेरीज १९० कोटी डॉलर्सची तयारी पूर्ण झाली. यामध्ये मुंबई मेट्रो-४ चाही समावेश आहे.एआयआयबी संपूर्ण आशियातील पायाभूत सुविधांना मदत करीत आहे. त्यातून बैठक भारतात होत असताना पाकव्याप्त काश्मीरबाबत नेमकी भूमिका काय? या प्रश्नाच्या उत्तरात अ‍ॅलक्झांडर म्हणाले,आमच्या बँकेचे काम केवळ पायाभूत सुविधांना अर्थसाहाय्य देणे आहे. त्यामध्ये राजकीय विचार केला जात नाही. बँकेचे पहिले काम पायाभूत सुविधांना अर्थसाहाय्य देणे एवढेच आहे. त्यात सर्व प्रकल्पांचा समावेश होतो. ८६ देश हे एआयआयबीचे सदस्य आहेत. युरोपीयन देशांचा समावेश त्यात अधिक आहे. भारताची बँकेत ८ टक्के भागीदारी असताना, चीनची भागिदारी मात्र ३० टक्के आहे. या बैठकीनिमित्त विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन रेल्वेमंत्री पीयूष गोयलयांनी रविवारी केले. केंद्रीयवित्त विभागाचे महासंचालक (जनसंपर्क) डी. एस. मलिक या वेळी उपस्थित होते.वडाळा ते कासारवडवली (ठाणे) या मुंबई मेट्रो-४ प्रकल्पासाठी वार्षिक १.९० ते २.३५ टक्के दराने १४ हजार कोटी रुपयांच्या अर्थसाहाय्याला एआयआयबीने मान्यता दिली आहे. त्याखेरीज आणखी ३,९०० कोटी रुपयांच्या मदतीची गरज असून, त्याबाबत एमएमआरडीए या बँकेशी चर्चा करणार आहे. एआयआयबीच्या या अर्थसाहाय्यला केंद्रीय वित्त मंत्रालयाचीही मंजुरी मिळाल्याचे वित्त सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी सांगितले. एआयआयबी राष्टÑीय पायाभूत सुविधा निधीत २० कोटी डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचे गर्ग म्हणाले.